पालकमंत्री मुश्रीफ झाले वाढपी

Shiv Bhoj Yojana started by Guardian Minister Mushrif
Shiv Bhoj Yojana started by Guardian Minister Mushrif

नगर : शिवभोजन योजनेमुळे गोरगरीब जनतेला दहा रुपयांत पोटभर अन्‍न मिळणार आहे. सामाजिक जाणिवेतून राज्य शासनाने ही योजना सुरु केली असून शासनाच्या या क्रांतीकारी निर्णयामुळे गरीब जनतेचे आशीर्वाद मिळतील आणि योजना अल्‍पावधीत लोकप्रिय होईल, असा विश्वास राज्‍याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे व्यक्त केला.

 येथील अहमदनगर रेल्वे स्टेशनसमोरील दत्त हॉटेल येथे शिवभोजन योजनेचा शुभारंभ श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्‍हाधिकारी राहूल द्विवेदी, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, प्र. पोलीस अधीक्षक सागर पाटील, जिल्‍हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी,  उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, दत्‍त हॉटेलचे गायकवाड कुटूंबिय यावेळी उपस्थित होते.

 यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांनी स्वत: हॉटेलमधील सर्व व्यवस्थेची पाहणी केली. तसेच तेथे जेवणासाठी आलेल्या माथाडी कामगारांशी संवाद साधला. त्यांना स्वत: हाताने थाळी वाढून दिली. त्यानंतर स्वत:ही या थाळीची चव घेतली. हे जेवण रुचकर आणि स्वादिष्ट असून दररोज येथे येणार्‍या गरीब व गरजूंना याचपद्धतीने चांगले जेवण द्या, अशी सूचना त्यांनी गायकवाड बंधूंना केली.

 महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि पुरोगामी राज्यात कोणीही भुकेले राहू नये, यासाठी राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात म्हणजे अवघ्या दहा रुपयांत प्रजासत्ताक दिनापासून शिवभोजन थाळी देण्याची योजना राज्य शासनाने सुरु केली. ही योजना अधिक चांगल्या पद्धतीने चालविण्याची जबाबदारी हॉटेलचालकांवर आहे. येथील परिसर स्वच्छता आणि अन्‍नाचा दर्जा उच्‍च प्रतीचा राखण्‍याची सूचना त्यांनी केली. जिल्‍हाधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखालील समितीने या सर्व बाबींचा वेळोवेळी आढावा घेण्‍याचे निर्देश दिले.

 शिवभोजन योजना

 ग्रामीण भागातून शहरात कामासाठी येणाऱ्या गोरगरीब जनतेला केवळ दहा रुपयांत पोटभर जेवण मिळणार आहे. शिवभोजन थाळीमध्ये दोन चपात्या,  एक वाटी भाजी, एक मूद भात आणि  एक वाटी वरण, दररोज दुपारी 12 ते 2 यावेळेत उपलब्ध होईल. शहरातील माळीवाडा बसस्‍थानक परिसरातील हमाल पंचायत सं‍चलित कष्‍टाची भाकर केंद्र, तारकपूर बसस्‍थानकासमोर हॉटेल सुवर्णम प्राईड संचलित अन्‍नछत्र, जिल्‍हा रुग्‍णालयाजवळ कृष्‍णा भोजनालय आणि मार्केटयार्ड परिसरात हॉटेल आवळा पॅलेश येथे शिवभोजन थाळी उपलब्‍ध करुन देण्‍यात  आली आहे. राज्य शासनाच्या दहा रुपयांत शिवभोजन थाळी योजनेमुळे अनेक गरजूंची सोय होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही महत्वाकांक्षी योजना असून संपूर्ण राज्यात  प्रायोगिक तत्वावर प्रत्येक जिल्ह्यात या योजनेचा प्रारंभ प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर करण्यात आला. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून ही योजना राज्याच्या इतर भागातही राबविण्यात येणार असून स्वस्त दरात स्वच्छ, पोषक आणि ताजे भोजन देणारी ही योजना निश्चितच यशस्वी होईल.

 यावेळ दत्त हॉटेलच्या वतीने सुरेश गायकवाड, दत्ता गायकवाड या बंधूंनी पालकमंत्री श्री. मुश्रीफ आणि उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com