esakal | ग्राउंड रिपोर्ट: भुकेल्या पोटाला आणि काय हवं?

बोलून बातमी शोधा

null

VIDEO: ग्राउंड रिपोर्ट! भुकेल्या पोटाला आणि काय हवं? पाहा व्हिडीओ

sakal_logo
By
विष्णू मोहिते, अजित झळके, शैलेश पेटकर

सांगली : राज्यात युतीचं शासन आलं तेंव्हा एक रुपयांत झुणका-भाकर मिळायची. ही योजना खूप गाजली आणि वादातही सापडली. वीस वर्षांनंतर शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारने "शिवभोजन' थाळी आणली. आधी ती पाच रुपयांत मिळायची. आता कोरोना निर्बंध काळात मोफत मिळतेय. लोक येतात, उभे राहतात, फोटो घेतला जातो. दोन भाज्या आणि चपातीचे पार्सल घेऊन लोक जातात. छान सावलीला बसून जेवतात. समाधानाची ढेकर देतात. त्यांना उपाशी किंवा अर्धपोटी रहावं लागत नाही. जिल्ह्यात 4 हजार 500 थाळ्यांचे वाटप सध्या सुरू आहे. या योजनेतून प्रत्येक केंद्रावर पाच-सात लोकांना रोजगार मिळाला. त्यापैकीच वसंतदादा मार्केट यार्ड केंद्रावर आज टीम "सकाळ'ने भेट देऊन व्यवस्था समजून घेतली.

वसंतदादा मार्केट यार्डच्या बैलगाडी अड्ड्यालगतचे हौसाबाई तातोबा रुपनर महिला बचत गटाचे शिवभोजन थाळी केंद्र. टेबलावर ठेवलेले दोन कॅरेट आणि त्यात भोजन. आत किचन शेड. एक मावशी पीठ मळत होती. दुसरी ताई चपात्या लाटत होती. तिसरी एकावेळी तीन तव्यांवर चपात्या भाजत होती. भाजताना त्यावर चमचाभर तेलही सोडत होती. एकजण पार्सलसाठी पिशवीत अन्न भरत होता. दुसरा फोटो काढून वाटप करत होता. सर्वांच्या चेहऱ्यावर मास्क होता. जेवण न्यायला येणाऱ्याकडे नाहक कुठली चौकशी केली जात नव्हती. दोन चपात्या (प्रत्येकी 30 ग्रॅम), एक वाटी भाजी (100 ग्रॅम), एक वाटी वरण (100 ग्रॅम), एक मुद भात (150 ग्रॅम), टोमॅटोचे दोन काप आणि रविवारी दोन चमचे श्रीखंड. भुकेल्या पोटाला आणि काय हवं? सकाळी 11 ते सायंकाळी 4 ही वेळ, पण जेवण पहिल्या दोन-तीन तासांत संपतं, असे चालक शरद रुपनूर यांनी सांगितले.

हेही वाचा- "हापूस' हवाय! मागवा आता ऑनलाईन; नोंदणीसाठी 'या; बेबसाईटचा करा वापर

फुकटं म्हणून कुणीही येऊन उभं रहात नाही

अन्न ही जगण्याची प्रथम गरजांपैकी एक. त्यासाठी कुणाला भीक मागायला लागू नये, हीच तर लोक कल्याणकारी शासनाकडून अपेक्षा. पाच रुपयांत ही थाळी मिळायची तेंव्हाही आणि आताही उगाच कुणीतरी येऊन उभा राहिलाय आणि फुकटात जेवन घेऊन गेलाय, असे होत नाही. ज्याला गरज असते तोच इथे येतो. कोरोना संकटात निर्बंध लादल्यानंतर अनेकांची चूल थंडावली. काही भिकारी आहेत, मजूर, हमाल, स्थलांतरित, बेघर आणि काही परगावचे विद्यार्थी...शिवभोजनाने त्यांना हात दिला. 26 जानेवारी 2020 रोजी योजना सुरु झाली. आता 15 एप्रिलपासून महिनाभर थाळी मोफत दिली जात आहे. जिल्ह्यात दररोज साडेचार हजार थाळ्यांचे उद्दीष्ट आहे. 22 केंद्रे आहेत.

नोंद ः ऑनलाईन अन्‌...

अनेकदा अपंग, ज्येष्ठ व्यक्ती भोजन न्यायला येतात. घरी अपंग, ज्येष्ठ, आजारी व्यक्ती असते. एका फोटोवर दोन थाळ्या अशक्‍य. अशावेळी एखादा जाणकार पुढे येतो आणि त्या अपंगाची मदत करतो. आपल्या फोटोवर त्याला थाळी देतो. हा गैरप्रकार नाही तर जगणे सुसह्य करणारा व्यवहार म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे, असे तत्वज्ञान तेथील अल्पशिक्षित हमाल सांगतात. हे फोटो ऑनलाईन राज्य शासनाकडे अपलोड होतात, कधीकधी इंटरनेट अडकते. त्यावेळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने वहीवर नाव, नंबर, सही, अंगठा घेऊन थाळी दिली जाते. बिले मंजुरीसाठी कुठलीही मध्यस्थ यंत्रणा नाही. थेट शासनाला अहवाल सादर होतो आणि ऑनलाईन पैसे जमा होतात, हा सुखद अनुभव असल्याचे संतोष कोपनूर यांनी सांगितले.

असे आहे आर्थिक गणित...

शिवभोजन थाळीसाठी जिल्ह्यात दररोज सरासरी दोन लाख रुपयांचे अनुदान या काळात मिळणार आहे. या रकमेत साडेचार हजार लोकांची भूक शमणार आहे. थाळीची प्रारंभी किंमत 10 रुपये होती. काही काळाने ती पाच रुपयांवर आणली गेली. आता एक महिना ती मोफत असेल. राज्य शासनाकडून एका मोफत थाळीसाठी केंद्र चालकांना शहरात 50 रुपये तर ग्रामीण भागात 40 रुपये दिले जातात. वसंतदादा मार्केट यार्डमधील केंद्रावर आठ लोकांना रोजगार मिळालाय. चार महिला, चार पुरुष कामगार आहेत. महिलांना 200 रुपये तर पुरुषांना 250 ते 300 रुपयांची रोजंदारी मिळते. सरासरी 30 ते 32 रुपये किलोचा तांदूळ आणि मालवा गोल्डसारखा 22 ते 23 रुपये किलोचा गहू वापरला जातो, याची खातरजमा केली.

शिवभोजन केंद्रे

- सांगली ः मार्केट यार्ड, बस स्थानक उपहारगृह, विजयनगर आणि सिव्हिल हॉस्पिटल

- मिरज ः बस स्थानक उपहारगृह आणि हॉटेल व्यंकटेश्वर स्टेशन रोड

- कुपवाड ः विकास सोसायटी आणि सई हॉटेल (एमआयडीसी)

- तासगाव ः संस्कृत बचत गट

- कवठेमहांकाळ ः स्वामी समर्थ नाष्टा सेंटर

- जत ः बस स्थानक कॅंटीन

- विटा ः शिवसाई जनसेवा केंद्र

- आटपाडी ः राधिका हॉटेल आणि हॉटेल ओमरत्न आणि एसटी कॅन्टीन

- पलूस ः शिवगंगा हॉटेल

- कडेगाव ः शिव हॉटेल

- आष्टा ः हॉटेल शिवन्या आणि हॉटेल श्री दत्तगुरू

- इस्लामपूर ः हॉटेल पंगत आणि हॉटेल बालाजी

- शिराळा ः गोपालकृष्ण बचत गट

Edited By- Archana Banage