video : शिवरायांच्या गजराने दुमदुमले नगर शहर 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 February 2020

जय शिवजी... जय भवानी... जय जिजाऊ... जय शिवराय अशा जय जयकाराने नगर शहर दुमदुमले. छत्रपती शहाजी राजे, राष्ट्रमात जिजाऊ आणि बाल शिवाजी महाराजांच्या वेषभूषामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी नगरकरांचे लक्ष वेधले. लेझीमपथक, ढोलपथक, झांजपथक शिवजयंती मिरवणुकीचे आकर्षण होते. 

नगर : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज शहरासह जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली. शहरात सकाळी मिरवणूक व दुचाकी फेरी काढण्यात आली. चौकाचौकांत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवून विविध सामाजिक कार्यक्रम झाले. शहरातील मिरवणुकीत विद्यार्थ्यांसह आबालवृद्धांनी सहभाग घेतला.

वाचा : कृषी मंत्री आले राहीबाईंच्या घरी, म्हणाले, बियाणे 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक सागर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी "सकाळ'चे कार्यकारी संपादक ऍड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील, आमदार संग्राम जगताप, अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, सचिव जी. डी. खानदेशे, महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. 

हे पहा : पेडगावमधील शंभूराजांच्या शौयस्तंभाला प्रशासनाने अशी दिली 

जागोजागी चॉकलेटचे वाटप 
जुन्या बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर साडेआठ वाजता मिरवणुकीला सुरवात झाली. जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज शिक्षण संस्थेचे रेसिडेन्शिअल हायस्कूल, बाल मंदिर, न्यू आर्टस कॉलेज, लॉ कॉलेज, छत्रपती शिवाजी महाराज इंजिनिअरिंग कॉलेज यांसह शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी राजमाता जिजाऊ, शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह विविध संतांच्या व महापुरुषांच्या वेशभूषा करून मिरवणुकीत सहभागी झाले होते. झांज, ढोल, लेझीमने मिरवणुकीतील उत्साह द्विगुणित केला. माणिक चौकात अचानक मित्रमंडळाने गुलाबपुष्प व चॉकलेटचे वाटप केले. मराठा उद्योजक संस्थेतर्फे दिल्ली गेट येथे विद्यार्थ्यांना खाऊ व पाणीवाटप करण्यात आले. 
विद्यार्थ्यांचे ढोलपथक, एनसीसी विद्यार्थ्यांचे झांजपथक मिरवणुकीचे आकर्षण ठरले. रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या प्रांगणात मिरवणुकीची सांगता झाली. 
मराठा सेवा संघातर्फे शहर व सावेडी उपनगरातून दुचाकी फेरी काढण्यात आली. चौथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून फेरीचा समारोप झाला. 

वाचा : शिर्डी बाळाची अशी झाली चोरी पहा 

मिरवणुकीत सौरऊर्जेवरील कार 
नेप्ती येथील छत्रपती इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिरवणुकीत सौरऊर्जेवर चालणारी कार सहभागी केली होती. ही कार सप्टेंबर महिन्यात पंजाबमध्ये होणाऱ्या फ्युचर सोलर डिझाईन चॅलेंज (एफएसडीसी) स्पर्धेत सहभागी होणार आहे. ही कारही मिरवणुकीत आकर्षणाचे केंद्र ठरली. 

मिरवणुकीत घुसली जिल्हा परिषदेची वाहने 
रस्त्यावर लहान मुले चाललेली असतानाच मिरवणुकीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्याधिकारी यांची वाहने शिरली. या वाहनांमुळे लहान मुलांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने, उपस्थित नागरिकांनी नाराजी व्यक्‍त केली. कोतवाली पोलिस घटनास्थळी असतानाही त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. पोलिसांकडून वाहतूक नियोजनाविषयीही काळजी न घेतली गेल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Jayanti Celebrated in the nagarcity