'शिवप्रतिष्ठान'चे राज्यभर मोर्चे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेतर्फे बुधवारी (ता. 28) काढण्यात येणाऱ्या मोर्चाची मोठी तयारी सुरू आहे. सांगलीसह राज्यात ठिकठिकाणी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच गोवा आणि बेळगावमध्येही मोर्चाची तयारी करण्यात आली आहे. सांगलीत निघणाऱ्या मोर्चासाठी एक लाख धारकरी सहभागी होतील, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी दिली. 

सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेतर्फे बुधवारी (ता. 28) काढण्यात येणाऱ्या मोर्चाची मोठी तयारी सुरू आहे. सांगलीसह राज्यात ठिकठिकाणी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच गोवा आणि बेळगावमध्येही मोर्चाची तयारी करण्यात आली आहे. सांगलीत निघणाऱ्या मोर्चासाठी एक लाख धारकरी सहभागी होतील, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी दिली. 

कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्याविरोधात नोंदवलेला गुन्हा मागे घ्यावा आणि त्यांना सन्मानपूर्वक मुक्त करावे, या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्चाला विविध राजकीय संघटनांबरोबरच 48 संघटनांनी मोर्चासाठी पाठिंबा दिल्याचे श्री. चौगुले यांनी सांगितले. 

ते म्हणाले,""राज्यात ठिकठिकाणी मोर्चा काढण्यात येणार आहे. सांगलीत होणारा मोर्चा सकाळी दहा वाजता पुष्पराज चौकातून निघेल. स्टेशन चौकात मोर्चाची सांगता होईल. शहरात आंबेडकर स्टेडियम, कल्पद्रूम क्रीडांगण याठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसचे ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. जिल्ह्यातून एक लाख धारकरी यात सहभागी होतील.'' 

ते म्हणाले,"" गेल्या तीन जानेवारीस राज्यात बंद काळात झालेल्या जातीय दंगलीस ऍड. प्रकाश आंबेडकर, आमदार जिग्नेश मेवाणी, उमर खलिद, माजी न्यायमूर्ती कोळसे-पाटील जबाबदार असून पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेवेळी या नेत्यांनी केलेल्या भडक भाषणांमुळेच महाराष्ट्र पेटला. त्यावेळी झालेल्या जातीय दंगलीस या नेत्यांना जबाबदार धरून अटक करावी. दंगलीत झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने न करता प्रकाश आंबेडकर आणि एल्गार परिषदेच्या नेत्यांकडून वसूल करावी. ही प्रमुख मागणी राहणार आहे.'' 

दरम्यान, पुष्पराज चौकातील कार्यालयात आज सायंकाळी संभाजीराव भिडे यांनी मोर्चाचा आढावा घेतला. त्यानंतर सायंकाळी परिसरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. 

या ठिकाणी निघणार मोर्चे 
बुधवारी एकाचवेळी सकाळी दहा वाजता पुढील शहरात मोर्चा निघणार आहे : कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे, मुंबई, येवतमाळ, जळगाव, नाशिक, गोंदिया, महाड, सिंधुदुर्ग, बेळगाव, गोवा.

Web Title: shiv pratishthan organises protests across state in support of Sambhaji Bhide