युतीच्या "घटस्फोटा'ला स्वबळाची किनार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

सातारा - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढेल, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याने जिल्ह्यातील राजकीय आडाखे बदलले आहेत. भाजप- शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, जिल्ह्यात स्वबळावर ताकद आजमावण्याची युतीच्या "घटस्फोटा'ला ते संधीच मानत आहेत, तरीही युती तुटल्याचा फायला दोन्ही कॉंग्रसला होऊ शकतो.

सातारा - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढेल, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याने जिल्ह्यातील राजकीय आडाखे बदलले आहेत. भाजप- शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, जिल्ह्यात स्वबळावर ताकद आजमावण्याची युतीच्या "घटस्फोटा'ला ते संधीच मानत आहेत, तरीही युती तुटल्याचा फायला दोन्ही कॉंग्रसला होऊ शकतो.

आगामी सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढेल. कोणाशीही युती करणार नाही, अशी घोषणा श्री. ठाकरे यांनी केली. एवढेच नव्हे तर स्थानिक पातळीवर कोणी दुसऱ्याशी हातमिळवणी केली, तर ती पक्षाशी, भगव्याशी गद्दारी असेल, अशांची गंभीर दखल घेतली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. श्री. ठाकरे यांच्या या भूमिकेने जिल्ह्यात काही प्रमाणात राजकीय समीकरणे बदलणार आहेत. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी, कॉंग्रेस, भाजप, शिवसेना या पक्षांत चौरंगी लढत होईल. खासदार उदयनराजे भोसले यांच्या "राजधानी सातारा जिल्हा विकास आघाडी'च्या समीकरणांवर पुढील राजकारण निर्णायक ठरणार आहे. श्री. ठाकरे यांच्या भूमिकेने उदयनराजेंबरोबर आघाडी करण्याचे दोरही शिवसेनेचे तुटले आहेत.

जिल्हा परिषदेत करिष्मा दाखविण्यासाठी वेळप्रसंगी युती करण्याच्या निर्णयाच्या दृष्टीने नेत्यांचे प्रयत्न सुरू होते. जिल्ह्यात दोन्हीही पक्षांची बेताची ताकद असल्याने युती करणे राष्ट्रवादीविरोधात लढण्यासाठी फायद्याचे ठरणार होते. युती तुटल्याचा फटका भाजपला पाटण, जावळी तालुक्‍यांत बसू शकतो. इतर तालुक्‍यांत भाजपला स्वत:ची ताकद आजमावता येईल. कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर, सातारा, वाई, माणमध्ये भाजपला शिवसेनेबरोबरच्या युतीचा फायदा होण्याची शक्‍यता कमी असल्याने भाजपही युती करण्याबाबत उत्साही नसल्याचे सांगितले जात होते. नगरपालिका निवडणुकीत बरोबर घेतले नसल्याने शिवसेनाही जिल्हा परिषद निवडणुकीत युतीच्या तयारीत नसल्याचे पदाधिकारी सांगत आहेत. मात्र, युती तुटल्याने त्याचा फायदा राष्ट्रवादी, कॉंग्रेसला होण्याची चिन्हे जास्त आहेत.

 

 

युती तुटल्याचा भाजपला तोटा होणार नाही. कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर, सातारा, जावळी, वाईसह उर्वरित भागांत भाजप पूर्ण ताकदीने लढेल. त्यातून पक्षाच्या ताकदीचा अंदाज येईल.

- विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष, भाजप

""स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे. युती करण्याची मानसिकताही नव्हती. युती केल्याने होणारी बंडखोरी, वादावादी आता टळेल. जिल्हा परिषदेत आम्ही ताकद आजमावून घेऊ. शिवसेनेला त्याचा नक्‍की फायदा होईल.''

- हर्षल कदम, जिल्हाप्रमुख, शिवसेना

Web Title: shiv sena bjp politics in satara