केबिन हटविण्यास शिवसेनेचा विरोध 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

महावीर उद्यानाजवळची केबिन काढून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी दुपारी चारपर्यंतची मुदत मागितली होती. त्याप्रमाणे आम्ही मुदत दिली आहे. त्यांनी केबिन जर हटविली नाही; तर मात्र पुन्हा पोलिस बंदोबस्तात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. 
- पंडितराव पोवार,अतिक्रमण विभागाचे प्रमुख 

कोल्हापूर - महावीर उद्यानाजवळची अतिक्रमणे हटविल्यानंतर पुन्हा येथे एक केबिन थाटात उभे राहिली. केबिन हटविण्यासाठी अतिक्रमण विभागाने पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू केली; पण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. केबिन हटवू देणार नाही, हे शिवसेना कार्यालयासाठी उभे केले आहे, असे म्हणत कार्यकर्त्यांनी कारवाईला विरोध केला. अखेर दुपारी चारपर्यंत केबिन काढून घेतो, असे कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना मुभा दिली आहे; पण जिल्हाधिकारी कार्यालयालगत काही काळ वातावरण तंग झाले. 

शहरात गेल्या महिन्यात अतिक्रमण मोहिम राबवण्यात आली. मोहिमेत अनेक ठिकाणची अतिक्रमणे हटविली. महावीर उद्यानालाही अतिक्रमणांनी विळखा घातला होता. त्यामुळे पालिकेने येथेही कारवाई केली. येथे परवाना असलेल्यांनाच व्यवसाय करण्याची मुभा आहे. उर्वरित सर्व केबिन येथून हटविली. दरम्यान, दोन दिवसांपासून येथे एक केबिन उभा राहिल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. चौकशीत शिवसेना शाखेच्या कार्यालयासाठी हे केबिन येथे उभे केल्याचे सांगण्यात आले. अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. पण तरीही केबिन काढण्यास कार्यकर्त्यांनी विरोध केला. परवानगी घेऊन केबिन काढा, आमचे काही मत नाही, असे अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना सांगीतले. पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी कारवाईला विरोधच केला. कार्यालयासाठी केबिन उभी केली आहे. आम्ही केबिन काढणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. पोलिस बंदोबस्तही तैनात होता. पण कार्यकर्त्यांचा विरोध काही केल्या मावळायला तयार नव्हता. अखेर दुपारी चारपर्यंत केबिन काढून घेऊ, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. त्यानंतर अधिकारी माघारी गेले. पण सायंकाळी चारनंतरही ही केबिन तेथेच उभी होती. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये धनाजी दळवी, अमर सूर्यवंशी, सदाशिव चव्हाण, राजन ठाकूर, शिवानी पाटाळे, मयूरी काटकर, संगीता चव्हाण, आरती सोनावणे, सिद्धार्थ केळगडे, अजित लोहार, सचिन बंदोडे, दीपाली पाटील, अण्णासो पाटोळे, अनिता कदम, सुवर्णा पाटील, रणजित साठे, रवी ठाकूर आदींनी या आंदोलनात भाग घेतला. 

Web Title: Shiv Sena opposed the cabin to delete