शिवसेनेपुढे पक्ष बांधणीचे शिवधनुष्य 

विशाल पाटील
शनिवार, 18 मार्च 2017

सातारा- गत दशकात जिल्ह्यात सुवर्णकाळ आलेल्या शिवसेनेला पालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत अल्प यशात संतुष्ट राहावे लागले. या निवडणुकीने घराघरांत पक्षाचे चिन्ह पोचले असले, तरी विधानसभेच्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी आता शिवसेनेची चांद्यापासून बांद्यापर्यंत पुनर्बांधणीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विधानसभानिहाय आढावा घेऊन शाखा प्रमुख ते जिल्हाप्रमुख पदापर्यंत बदलीचे संकेत मिळत आहेत. 

सातारा- गत दशकात जिल्ह्यात सुवर्णकाळ आलेल्या शिवसेनेला पालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत अल्प यशात संतुष्ट राहावे लागले. या निवडणुकीने घराघरांत पक्षाचे चिन्ह पोचले असले, तरी विधानसभेच्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी आता शिवसेनेची चांद्यापासून बांद्यापर्यंत पुनर्बांधणीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विधानसभानिहाय आढावा घेऊन शाखा प्रमुख ते जिल्हाप्रमुख पदापर्यंत बदलीचे संकेत मिळत आहेत. 

जिल्ह्यातील पालिका निवडणुकांपाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समितीत शिवसेनेने तुरळक स्वरूपात यश मिळविले. ही निवडणूक घराघरांत चिन्ह पोचविण्यासाठी शिवसेनेला फायद्याची ठरली आहे. मात्र, पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांचा मतदारसंघ सोडला, तर शिवसेनेला कोठेच अपेक्षित यश मिळाले नाहीत. पाटणवगळता इतरत्र हाताच्या बोटावर मोजता येईल, इतकेच यश पंचायत समितीत मिळाले. या निवडणुकीत पदाधिकाऱ्यांना तर मतदारांना मतदान यंत्रातून गारच केले आहे. ज्यांना जनतेने नाकारले ते विधानसभेसाठी पक्षवाढीचे काय काम करणार, असा सवालही पक्षातून उमटविला जात आहे. मिरवण्यापुरते पक्षातील पदे घ्यायची, त्यातून "अर्थ'क्रांती करायचा, असा "उद्योग' शिवसेनेत सुरू झाल्याने सेनेला जिल्हाभरात घरघर लागली आहे. 

त्या तुलनेत भारतीय जनता पक्षाने अल्प काळात जिल्ह्यात उभारी घेतली आहे. गत जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला 28, कॉंग्रेसला 13, भाजपला 11, तर शिवसेना पाच टक्‍के मते मिळाली आहेत. विधानसभा निवडणुकीत यश मिळविण्यासाठी शिवसेना "फिनिक्‍स' भरारीप्रमाणे घेण्याची आवश्‍यकता आहे. त्यादृष्टीने शिवसेनेत हालचालीही सुरू झाल्या आहेत. थेट शिवसेना भवनातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुनर्बांधणीचे संकेत कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत पदाधिकारी बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हाप्रमुख पदासाठी इच्छुक असलेल्यांनी शिवसेना भवनापर्यंत फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे. 

एक की दोन जिल्हाप्रमुख? 
पूर्वी साताऱ्यासाठी एकच जिल्हाप्रमुख पद होते. त्यानंतर पक्ष बांधणी वाढविण्यासाठी दोन जिल्हाप्रमुख पदे देण्यात आली. मात्र, त्याला अपेक्षित यश आले नसल्याचे शिवसेनेतील जुन्या कार्यकर्त्यांचे मत आहे. नव्याने जिल्हाप्रमुख नेमताना जिल्ह्यासाठी एकच पद ठेवायचे की दोन, याचीही चर्चा शिवसेनेतील वरिष्ठांत सुरू आहे. नवीन पदाधिकारी नेमताना तरुणांना संधी दिली जाणार आहे. 

का घेईना शिवसेना उभारी? 

* वरिष्ठ मंत्र्यांचे दुर्लक्ष 
* अंतर्गत गटबाजीचे ग्रहण 
* तळागळातील तुटलेली नाळ 
* पदाधिकाऱ्यांचा नाही लोकसंग्रह 
* पराभूत विधानसभेत कसे चालतील? 

""शिवसेनेची जिल्हा कार्यकारिणीची पुनर्बांधणी केली जाणार आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेऊन ज्यांनी पक्षाचे काम केले, त्यांना संधी दिली जाईल. शाखाप्रमुखांपासून ते जिल्हाप्रमुखांच्या कामाचा आढावा घेतला जाईल. तरुणांना संधी देऊ.'' 
-नितीन बानगुडे-पाटील, उपनेते, शिवसेना. 

Web Title: Shiv Sena party build sivadhanusya