करमाळा बाजार समितीत "बंड'गर! 

bandgar
bandgar

करमाळा (सोलापूर) : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती निवडणुकीला नाट्यमय कलाटणी मिळाली. शिवसेनेचे आमदार नारायण पाटील गटाचे प्रा. शिवाजीराव बंडगर यांनी बंडखोरी करत थेट बागल गटात प्रवेश करून सभापती पद मिळवले. तर उपसभापतिपदी चिंतामणी जगताप यांची निवड झाली. 

बुधवारी (ता. 3) सभापती व उपसभापती पदासाठी मतदान झाले. त्यात बागल गटाच्या सभापती, उपसभापती पदाच्या उमेदवारांना प्रत्येकी नऊ मते मिळाली. जगताप गटाकडून शिंदे गटाचे सभापती पदाचे उमेदवार चंद्रकांत सरडे व उपसभापती पदाचे उमेदवार औदुंबर मोरे यांना आठ मते मिळाली. माजी आमदार जयवंतराव जगताप यांची 29 वर्षांची एकहाती सत्ता यावेळी बागल गटाने घालवली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार पाटील यांनी जगताप यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. झरे गणातून पाटील गटाचे एकमेव सदस्य म्हणून प्रा. शिवाजीराव बंडगर विजयी झाले होते. पाटील- जगताप गटाला आठ जागा मिळाल्या होत्या, त्यात दोन बिनविरोध आहेत. बागल गटाला आठ जागा मिळाल्या तर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे गटाला एक जागा मिळाली होती. शिंदे गटाला मानणाऱ्या सावंत गटाची हमाल व तोलारची एक जागा बिनविरोध आली होती.

निकाल लागल्यापासूनच बागल गटाने सत्ता स्थापनेसाठी वेगाने हलचाली सुरू केल्या होत्या. त्यांना फक्त एका जागेची गरज होती. बागल गटाच्या नेत्या रश्‍मी बागल, विलासराव घुमरे व दिग्विजय बागल हे पाटील- जगताप गटाच्या संचालकांच्या संपर्कात होते. सावंत गटाला हाताळण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्याच वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे गटाचे चंद्रकांत सरडे यांनाही बागल गटात प्रवेश केल्यास सभापती पदाची ऑफर दिली. 
प्रा. बंडगर हे पाटील गटाचे अंत्यत विश्‍वासू असल्याने गट सोडू शकतात अशी शंका नव्हती. मात्र, अचानक त्यांनी घेतलेला पवित्र आश्‍चर्यकारक समजला जात आहे. हा आमदार पाटील यांना धक्का आहे. रात्री उशिरापर्यंत झालेल्या चर्चेत जयवंतराव जगताप यांना सभापती करण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र, सकाळी लवकरच बागल गटाच्या नेत्यांनी प्रा. बंडगर यांच्याशी संपर्क साधून ढोकरी येथून थेट बागल निवासस्थानी आणले. त्यानंतर जगताप व पाटील गटाने बंडगर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क झाला नाही. बागल गटाने चतुराईने केलेल्या राजकारणाने बाजार समितीत सत्तापरिवर्तन झाले आहे. 

विश्‍वासात घेतले नाही : प्रा. बंडगर 
प्रा. बंडगर हे आमदार पाटील यांचे विश्‍वासू सहकारी आहेत. संजय गांधी निराधार समितीचे ते अध्यक्ष आहेत. ते झरे गणातून जगताप- पाटील गटातून विजयी झाले. ते अकलूज येथील मोहिते- पाटील यांच्या तंत्रशिक्षण विभागात प्राध्यापक आहेत. बागल यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रा. बंडगर म्हणाले, "बाजार समितीची निवडणूक झाल्यापासून आमदार पाटील व माजी आमदार जगताप यांनी विश्‍वासात घेतले नाही. साधी विचारपूसही केली नाही. बागल गट मला सभापती पदाची संधी देत असल्याने आपण बागल गटात प्रवेश करत असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com