शिवाजी पूल सर्व वाहनांसाठी खुला

शिवाजी पूल सर्व वाहनांसाठी खुला

कोल्हापूर - शिवाजी पूल आज सायंकाळी सर्व वाहनांसाठी खुला झाला. ‘याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दुपारी देऊनही सायंकाळपर्यंत केवळ दुचाकींनाच प्रवेश दिला जात होता. त्याचा फटका खुद्द श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनाही बसला. 

पोलिसांनी चालकाच्या विनंतीवरून त्यांना प्रवेश दिला; मात्र इतर सर्वच प्रवाशांना वडणगे फाट्यापासून पुढे पायपीट करावी लागली. यामुळे शिवाजी पूल सर्वच वाहनांसाठी खुला, हा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश सायंकाळपर्यंत तरी कागदावरच राहिला. सायंकाळी पाचनंतर हा मार्ग सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. 

आजच्या सहाव्या दिवशीही शिवाजी पुलावर दुचाकी वगळता इतर सर्व वाहनांना प्रवेश बंद राहिला. काल (ता. ९) करवीरचे आमदार चंद्रदीप नरकेंच्या आक्रमक भूमिकेमुळे शिवाजी पुलावरून किमान दुचाकींना तरी प्रवेश मिळाला. तेथेही आधी चालू नंतर बंद आणि पुन्हा चालू असा प्रकार झाला. यानंतर जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी महामार्ग विभागाकडून आलेल्या माहितीच्या आधारे शिवाजी पूल सर्व वाहनांसाठी खुला करण्याचे आदेश दिले. तसेच पुलाचे पाणी ओसरल्यावर स्ट्रक्‍चरल ऑडिट करून घेण्याचाही आदेश सार्वजनिक बांधकाम आणि महामार्ग विभागाला दिला. साधारण साडेअकरा-बारा वाजता याबाबतची कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालयातून झाली. मात्र दुपारी चारपर्यंत दुचाकीव्यतिरिक्त एकाही वाहनास शिवाजी पुलावरून सोडले जात नव्हते. दुपारी तीन-साडेतीन वाजता श्रीमंत शाहू छत्रपती महाराज कुटुंबीयांसमवेत तेथून आंबेवाडीकडे जात होते. त्यांचीही मोटार अडविण्यात आली. चालकाने पोलिसांना विनंती केल्यावर पोलिसांनी त्यांना प्रवेश दिला; मात्र इतर कोणत्याही वाहनांना प्रवेश देण्यास नकार दिला. वडणगे फाट्यावर एसटी बस थांबून होत्या. तेथील पेट्रोल पंपाच्या जागेवर बस स्थानकासारखीच स्थिती झाली होती. 

सायंकाळी वाहतूक सुरू

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शिवाजी पुलावरील वाहतूक सुरू करण्यास सध्या तरी कोणताही धोका नसल्याचे पत्र जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना दिले. डॉ. सैनी यांनी दुपारी बाराच्या सुमारास या पत्रावर सही करून शिवाजी पूल सर्व वाहनांना प्रवेशासाठी खुला केला; पण त्याची सायंकाळी पाचपर्यंत अंमलबजावणी झाली नाही. वास्तविक प्राधिकरण अधिकाऱ्यांनी या आदेशानुसार पोलिसांना सूचना देऊन शिवाजी पुलावरील वाहतूक सुरू करायला पाहिजे होती; पण त्याची सूचना पोलिसांना मिळाली नाही. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात येतात तहसीलदार योगेश खरमाटे यांनी प्रत्यक्ष शिवाजी पुलावर जाऊन वाहतुकीसाठी हा मार्ग खुला केला.

सावळ्या गोंधळाचा नागरिकांना फटका

प्रवाशांना पुलापर्यंतच सोडले जात असल्यामुळे तेथून शिवाजी पूल ओलांडण्यासाठी पायपीटच करावी लागली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाबाबतची माहिती व्हॉटस्‌ ॲपवरून फिरत होती; मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश कागदावरच राहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com