दोन आमदारांच्या गटांत ‘हायहोल्टेज ड्रामा’

Shivendrasinhraje-and-Shashikant
Shivendrasinhraje-and-Shashikant

कुडाळ - जावळी तालुक्‍यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील समजली जाणारी सोनगाव ग्रामपंचायतीची निवडणूक सध्या चर्चेचा विषय बनली आहे. आमदार शशिकांत शिंदे यांचे स्वीय सहायक मयूर देशमुख व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व बाजार समितीचे माजी उपसभापती जयदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दोन गटांत सामना रंगला असून, अप्रत्यक्षरित्या आमदार शिंदे गट व आमदार भोसले गट या राष्ट्रवादीतीलच दोन अंतर्गत गटांत ही लढत होत असल्याने तालुक्‍यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. 

निवडणुकीच्या प्रचारात प्रत्यक्षात जरी दोन्ही नेत्यांचा सहभाग नसला तरी कार्यकर्त्यांत सुरू असलेल्या घमासानीमुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर पक्षांतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. निवडणूक जरी ग्रामपंचायतीची असली तरी विधासभेपूर्वीची ही रंगीत तालीम समजली जात असून यानिमित्ताने नेत्यांची प्रतिष्ठा मात्र पणाला लागली आहे. लोकसभेच्या निकालानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीला जणू ग्रहणच लागलेले असल्याचे समोर येत असताना नेत्यांतील अंतर्गत खदखद काही केल्या कमी होत नसल्याचे यानिमित्ताने पुन्हा स्पष्ट झाले आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी नुकतीच पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रसारमाध्यमांसमोर खासदार उदयनराजे हे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांच्या मदतीने जावळीत त्यांच्या विरोधात कारस्थाने करत असल्याची जाहीर तक्रार केली होती. अशातच सोनगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षांतर्गत गट एकमेकांसमोर उभे ठाकल्याने ही खदखद पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदार शिंदे हे तालुक्‍याचे सुपुत्र व माजी आमदार असल्याने त्यांचे आजही जावळीत अनेक कट्टर कार्यकर्ते कार्यरत आहेत. तालुक्‍यातील अनेक कार्यक्रमांना आमदार शिंदे आवर्जून हजेरी लावतात, गाठीभेठी घेतात. त्यामुळे त्यांची येथील जनतेशी असलेली नाळ त्यांनी सातत्याने दाखवून दिली आहे. त्यामुळे त्यांना मानणारा एक गट तालुक्‍यात निश्‍चितच कार्यरत राहिलेला आहे. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनीही गेल्या दहा वर्षांत ‘गाव तिथे विकासकाम’ करून एक एक कार्यकर्ता जोडला आहे, खासकरून युवक वर्गामध्ये त्यांनी स्वतःची मजबूत फळीही तयार केली आहे.

विकासकामांच्या जोरावर त्यांनी तालुक्‍यातील जनतेला आपलेसे केले आहे. त्यामुळे त्यांना मानणाराही मोठा वर्ग तालुक्‍यात आहे. तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार म्हणून शिवेंद्रसिंहराजे यांनाच तालुक्‍याचे राजकीयद्रष्ट्या सर्वतोपरी अधिकार असावेत, अशी माफक अपेक्षा शिवेंद्रसिंहराजेंच्या कार्यकर्त्यांची कायमच राहिलेली आहे. मात्र, तालुक्‍यातील बहुतांशी निवडणुकीवेळी तसेच उमेदवारी व पदाधिकारी निवडीवेळी आमदार शिंदे यांचा वरचष्मा राहिल्याने हा ‘बाबां’चा तो ‘साहेबां’चा अशा चर्चा अनेकवेळा ऐकावयास मिळाल्या आहेत.

नेत्यांच्यात जरी सर्व काही ठिकठाक दिसत असले तरी कार्यकर्त्यांत मात्र सर्व काही आलबेल नसल्याचेच अनेकवेळा सिद्ध झालेले आहे, मग त्याला कुडाळ येथे दोन्ही आमदारांच्या गटात झालेली क्रिकेटची ऐतिहासिक मॅच असो किंवा नुकत्याच झालेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीवेळी उमेदवारी देताना साधलेला समतोल असो, काहीही अपवाद राहिलेला नाही.

त्यामुळे तालुक्‍यात राष्ट्रवादीअंतर्गत दोन गटच नाहीत, हे मात्र म्हणणे साफ चुकीचे ठरेल. आजपर्यंत अनेक वेळा कोणाचा हस्तक्षेप, कोणाचे वर्चस्व हे सातत्याने दिसून राहिले आहे. त्यामुळेच सोनगावची निवडणूक ही देखील तालुक्‍याला नवीन राहिलेली नाही. मयूर देशमुख यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्याचा आरोप शिवेंद्रसिंहराजे गटाच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे, तर गावात विकासकामे होत नसल्याने नाईलाजास्तव निवडणूक लढवावी लागत असल्याचे शिंदे गटाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून आमदार शशिकांत शिंदे गट व शिवेंद्रसिंहराजे भोसले गट या दोन्ही गटांत नेमकी बाजी कोण मारणार, याकडे संपूर्ण तालुक्‍याचे लक्ष लागून राहिले आहे.

दहा जागांसाठी दोन्ही गटांकडून २० उमेदवार आपले नशीब या निमित्ताने आजमावत आहेत तर सरपंचपद ओबीसी महिला राखीव असल्याने माजी उपसभापती जयदीप शिंदे यांच्या गटाकडून सरपंचपदासाठी वंदना पालकर, तर मयूर देशमुख यांच्या गटाकडून शशिकला किरवे या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आमदार शशिकांत शिंदे गट आणि शिवेंद्रसिंहराजे गट या दोन्ही गटांत यानिमित्ताने ‘हायहोल्टेज ड्रामा’ सुरू झाला आहे. राष्ट्रवादीअंतर्गत गटबाजीत विधानसभेसाठी शड्डू ठोकून बसलेले भाजपचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांची भूमिका काय? ते आतून का होईना पण कोणाला मदत करणार? हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. सोनगाव ग्रामपंचायतीसाठी एकूण १७०० मतदार मतदान करणार असून, मोठी ग्रामपंचायत असल्याने दोन्ही गटांकडून जोरदार ‘फिल्डिंग’ लावली गेली आहे. सुज्ञ मतदारराजा नक्की कोणाच्या बाजूने कौल देणार, हे पाहणे मात्र औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना गावातील गुजरवाडी, सांगवी या वस्त्यांना अद्याप रस्त्यासारख्या मूलभूत गरजा उपलब्ध नाहीत, ही विकासाबाबतची खरी शोकांतिका आहे. आम्ही पक्षाच्या किंवा कोणत्याही नेत्यांच्या विरोधात नाही. मात्र, गावात विकासकामे होणे आवश्‍यक आहे. म्हणूनच स्थानिक जनतेच्या उठावामुळे आणि आग्रहाखातर ही निवडणूक लढवली जात आहे.
- मयूर देशमुख, स्वीय सहायक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com