टोलमुक्‍त सातारासाठी पूढाकार घेणार : शिवेंद्रसिंहराजे भोसले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

भुमिपुत्रांच्या जमिनी घेवून त्यांच्याकडूनही सक्‍तीने टोलवसुली केली जाते. ही बाब अन्यायकारक असून त्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी आमदार भाेसले चर्चा करणार आहेत.

सातारा - सातारा- पुणे राष्ट्रीय महामार्गाची खड्डयांमुळे दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. दरवर्षीची ही परिस्थिती असून टोल विरोधी सातारी जनता या सामाजिक समुहाने आधी रस्त्यांची दुरुस्ती मग टोल वसुली ही घेतलेली भुमिका योग्य आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधीत ठेकेदार यांनी येत्या 10 दिवसांत सातारा- पुणे महामार्गाची दुरुस्ती करावी अन्यथा अकराव्या दिवशी टोलबंद करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे. 

सातारा- पुणे राष्ट्रीय महामार्गाची दरवर्षी खड्डयांमुळे चाळण झालेली असते. मोठमोठ्या खडड्यांमुळे दररोज छोटे- मोठे अपघात घडत आहेत. यामध्ये अनेकांना आपला प्राण गमवावा लागतो तर, अनेक जण कायमचे जायबंदी होत आहेत. लोकांच्या जीवाशी खेळ सुरु असून जीवीत व वित्त हानी होत असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण डोळ्यावर पट्टी बांधुन बघ्याची भुमिका घेत आहे. प्राधिकरणाने नेमलेल्या ठेकेदारास तर लोकांच्या जीवाचे काहीही देणेघेणे राहिले नसल्याचे स्पष्ट होत आहे.

दळणवळणासाठी दर्जेदार महामार्ग असावा, वाहनचालक आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी टोलवसुली आहे, का ठेकेदाराचे इमले उभे करण्यासाठी टोल वसुली आहे, हेच कळेनासे झाले आहे. सातारा- पुणे महामार्गावर सातत्याने खड्डे पडत आहेत. जनतेमधुन संतापाची लाट उभी राहिली की तेवढ्या पुरती मलमपट्टी होते. पुन्हा पहिले पाडे पंचावन्न.
 
आता मात्र हद्द झाली आहे. कुंभकर्णी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स ठेकेदार यांना वठणीवर आणणे आवश्‍यक बनले आहे. टोल विरोधी सातारी जनता या सामाजिक समुहाने योग्य भुमिका घेतली असून आधी सुविधा द्या मगच टोल वसुली करा, हे रास्तच आहे. त्यामुळे येत्या 10 दिवसांत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स ठेकेदार यांनी सातारा हद्दीतील महामार्गाची दुरुस्ती करावी आणि प्रवाशांचे होणारे हाल थांबवावेत. अन्यथा अकराव्या दिवशी आनेवाडी येथे टोलबंद आंदोलन छेडले जाईल असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. 

टोलमुक्‍त साताऱ्यासाठी ना. गडकरींना भेटणार 

आनेवाडी व परिसरातील गावकऱ्यांसह महामार्गालगत असलेल्या सातारा तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गाच्या सहापदरीकरणासाठी गेल्या आहेत. आनेवाडी टोल नाक्‍यावर या भुमिपुत्रांनाही टोलसाठी अरेरावी आणि दमदाटीचे प्रकार सुरु असतात.

सातारा शहर आणि सातारा व जावली तालुक्‍यातील नजीकच्या गावांमधील लोकांना कामानिमीत्त, समारंभानिमीत्त भुईंज, पाचवड, वाई, जोशी विहीर, सुरुर आदी ठिकाणी सातत्याने ये-जा करावी लागते. त्यांनाही टोल द्यावा लागतो. भुमिपुत्रांच्या जमिनी घेवून त्यांच्याकडूनही सक्‍तीने टोलवसुली केली जाते. ही बाब अन्यायकारक आहे.

त्यामुळे लवकरच रस्ते आणि भूपृष्ठवहन खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे. सातारा व जावली तालुक्‍यातील महामार्गालगतच्या गावातील वाहनचालकांना टोल आकारु नये याबाबत चर्चा करुन सातारा टोलमुक्‍त करणार असल्याचेही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivendrasinhraje Bhosale to lead for toll-free Satara