खुशीत गाजरे खाणाऱ्यांची झोप उडाली ; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंवर निशाणा

सिद्धार्थ लाटकर
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

शहरातील मूर्तींचे विसर्जन कोठे करायचे याबाबत निर्णय आणि तोडगा काढण्यास पालिकेने उशीर केला. आता बैठका घेऊन आणि चर्चा करून सत्ताधारी आपली चूक लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. वास्तविक विसर्जन कोठे करायचे याचा निर्णय गणेश मंडळे घेऊ शकत नाहीत.

सातारा : विसर्जनाची जबाबदारी पालिकेची असताना कुचकामी, नियोजनशून्य कारभार आणि स्वत:चा नाकर्तेपणा लपवण्यासाठीच लोकप्रिय खासदार जिल्हाधिकाऱ्यांना दगड संबोधून लपण्याचा प्रयत्न करत आहेत. मूर्तीविसर्जनाला तोशीस लागली, तर सातारकर तुम्हाला माफ करणार नाहीत, असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे. 

शहरातील मूर्तींचे विसर्जन कोठे करायचे याबाबत निर्णय आणि तोडगा काढण्यास पालिकेने उशीर केला. आता बैठका घेऊन आणि चर्चा करून सत्ताधारी आपली चूक लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. वास्तविक विसर्जन कोठे करायचे याचा निर्णय गणेश मंडळे घेऊ शकत नाहीत. त्यामुळे चर्चेचा फार्स कशासाठी केला ? काही दिवसांपूर्वीच खासदारांनी रिसालदार तळ्यात विसर्जन करण्याचा निर्णय जाहीर केला होता; पण पोलिस प्रशासनाने विसर्जनास नकार दिला आहे. त्यामुळे खुशीत गाजरे खाणाऱ्यांची झोप उडाली आहे. त्यावर आता त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दगडाची उपमा देऊन आपला नाकर्तेपणा लपवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना जनाची नाही, तर मनाची तरी लाज वाटायला हवी होती.''

गणेश विसर्जनाचा प्रश्न सुटला नाही. तर सातारकर जनता तुम्हाला कदापि माफ करणार नाही, याचे भान ठेवा आणि तातडीने हा प्रश्‍न सोडवा. जिथे चुकीचा कारभार तिथे नगर विकास आघाडी तुम्हाला विरोधच करत आली आहे आणि सातारकरांच्या हितासाठी यापुढेही विरोध करत राहील, असा इशाराही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला आहे.

Web Title: Shivendrasinhraje criticizes Udayan raje Bhosale