वृक्षमित्र ‘मंगळवार’ अन्‌ पक्षीमित्र ‘उत्तरेश्‍वर’...!

संभाजी गंडमाळे
बुधवार, 26 एप्रिल 2017

रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यंदाही परंपरेनेनुसार शुक्रवारी (ता.२८) साजरी होणार आहे. भव्य मिरवणुका मंडळांच्या आकर्षण असल्या तरी उत्सवांतर्गत आठवडाभर विविध विधायक उपक्रम होणार आहेत. शिवचरित्रावर वैचारिक मंथन घडवतानाच आता शिवजयंतीच्या वर्गणीतून विविध सामाजिक उपक्रमांवर भर दिला जातो आहे. अशा विविध सेवाभावी उपक्रमांविषयी आजपासून...!

ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तरुणाईचा पुढाकार अन्‌ शालेय विद्यार्थ्यांचा सहभागही

रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यंदाही परंपरेनेनुसार शुक्रवारी (ता.२८) साजरी होणार आहे. भव्य मिरवणुका मंडळांच्या आकर्षण असल्या तरी उत्सवांतर्गत आठवडाभर विविध विधायक उपक्रम होणार आहेत. शिवचरित्रावर वैचारिक मंथन घडवतानाच आता शिवजयंतीच्या वर्गणीतून विविध सामाजिक उपक्रमांवर भर दिला जातो आहे. अशा विविध सेवाभावी उपक्रमांविषयी आजपासून...!

ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तरुणाईचा पुढाकार अन्‌ शालेय विद्यार्थ्यांचा सहभागही

कोल्हापूर - शिवजयंतीचा सोहळा म्हणजे साऱ्या पेठांना एकवटणारा कोल्हापूरकरांचा जणू एक सणच. आठवडाभर विविध कार्यक्रमांनी पेठापेठांत हा उत्सव विविध उपक्रमांनी साजरा होतो. मिरजकर तिकटीला राजर्षी शाहू तरुण मंडळातर्फे होणारा उत्सव आता वृक्षमित्र उत्सव म्हणून नावारूपाला आला आहे; तर संयुक्त उत्तरेश्‍वर पेठेने सलग तीन वर्षे डॉल्बीमुक्त मिरवणुकीचा आदर्श देत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करताना यंदापासून चिमण्या आणि पक्ष्यांसाठी विधायक उपक्रमांवर भर दिला आहे. दरम्यान, ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तरुणाईचा पुढाकार आणि विधायक उपक्रमांत शालेय विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग, यामुळे पेठापेठांतील तीन पिढ्या या उत्सवाच्या निमित्ताने एकवटल्या आहेत. 

राजर्षी शाहू तरुण मंडळाने पहिल्यापासूनच उत्सवाच्या निमित्ताने प्रबोधनाचा जागर मांडला. उत्सवाच्या निमित्ताने वृक्षारोपणाची परंपरा या मंडळाने जपली. प्रत्येक वर्षी दोन किंवा तीनच झाडे लावायची आणि पुढे त्यांचे वर्षभर जतन करायचे, हा विचार मंडळाने पुढे आणला आणि तो आजतागायत जपला. मिरजकर तिकटी परिसरात रस्त्याला जी काही झाडे सध्या सावली देतात, त्यांचे अंकुर फुलले ते शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानेच. प्रबोधनाचा जागर मांडताना मिरवणुकीतील फलकांना सामाजिक प्रश्‍नांची झालर दिलीच. त्याशिवाय अनेक वक्‍त्यांना या मंडळाने निमंत्रित केले. दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके, नितीन बानुगडे-पाटील अशा वक्‍त्यांची सुरवातीच्या काळातील व्याख्याने या मंडळाने आयोजित केली. मर्दानी खेळांची परंपरा या मंडळाने जपली आहेच. त्याशिवाय विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनाही सुरू केली. बदलत्या काळात महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी खाद्य महोत्सवांचे आयोजन सुरू केले आणि पेठेतील पुढच्या पिढीला उत्सवात सहभागी करून घेण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन सुरू केले. त्यातून हे विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी भरभरून बोलू लागले आणि ही पिढी आपसूकच उत्सवात सहभागी होऊ लागली. परिसरातील ज्येष्ठांचा यथोचित सन्मानही मंडळातर्फे प्रत्येक वर्षी आवर्जून केला जातो. 

प्राचीन वारसा लाभलेल्या उत्तरेश्‍वर पेठेच्या संयुक्त शिवजयंती सोहळ्याचे यंदाचे तिसरे वर्ष असले तरी पेठेतील शिवजयंतीला तसा मोठा इतिहास आहे. त्रिशताब्दी शिवजयंती सोहळा या पेठेनेच शहरात मोठ्या प्रमाणावर साजरा केला होता. त्यानंतर शिवजयंतीचा सोहळा एकत्र येऊन फारसा कधी झाला नाही आणि ज्येष्ठांच्या मनातील हीच सल ओळखून तीन वर्षांपूर्वी पेठेतील सारी तरुण मंडळे, तालमी आणि महिला बचत गट एकत्र आले. मात्र हा सोहळा साजरा करताना जाणीवपूर्वक एक आचारसंहिताही घालून घेतली. मिरवणुकीला डॉल्बीचा दणदणाट नसेल आणि रात्री दहापूर्वी मिरवणुकीची सांगता झाली पाहिजे, ही प्रमुख आचारसंहिता. त्यामुळे पारंपरिक वाद्यांचा थाट अनुभवायचा असेल तर ‘उत्तरेश्‍वर’च्या मिरवणुकीला या, अशी एक ओळखच निर्माण झाली. त्याशिवाय शिवजयंती उत्सवात पान-सुपारी ही संकल्पना राबवली गेली. मर्दानी खेळ आणि महिला बचत गटांना प्रोत्साहनपर विविध उपक्रम राबवले आणि यंदापासून कृतिशील पाऊल उचलताना परिसरातील विविध ठिकाणी चिमण्या व इतर पक्ष्यांसाठी घरटी लावली. या घरट्यांवर कायमस्वरूपी लक्ष ठेवण्याची जबाबदारी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांच्या टीमवर देण्यात आली. हे विद्यार्थी आता उन्हाळ्याच्या सुटीत घरट्याच्या ठिकाणी पाणी आणि खाद्याची उपलब्धता करतील. त्याशिवाय तेथे पक्षी येतात का, त्यांचे जीवनचक्र तेथे सुरू झाले आहे का, याच्या नोंदीही ठेवतील. पुढच्या पिढीतील पर्यावरणविषयक जाणिवा अधिक समृद्ध होण्याची ही एक सुरवात असेल. 
         
ज्येष्ठांनी सुरू केलेल्या परंपरेला कोणताही छेद जाणार नाही, याची खबरदारी आम्ही नेहमीच घेतो. उत्सवातून भपकेबाजपणापेक्षा शिवचरित्र अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावे, हाच आमचा उद्देश आहे. 
- महेश जाधव, अध्यक्ष उत्सव समिती, मंगळवार पेठ

पेठेचा संयुक्त शिवजयंती सोहळा असावा, ही ज्येष्ठांच्या मनातील भावना ओळखून आम्ही सोहळ्याला प्रारंभ केला. पारंपरिक वाद्यांच्या निनादातच मिरवणुकीची परंपरा आम्ही जपली असून ती भविष्यातही कायम राहील.
- स्वप्नील सावंत, अध्यक्ष उत्सव समिती, उत्तरेश्‍वर पेठ

Web Title: shivjayanti celebration programme