शिवसेनेच्या अनिता मगर यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा आदेश 

विजयकुमार सोनवणे
रविवार, 5 ऑगस्ट 2018

जिल्हा न्यायालयाच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. त्या ठिकाणी आम्हाला निश्‍चित न्याय मिळेल. 
- अनिता मगर, नगरसेविका

सोलापूर : तिसरे अपत्य असल्याच्या कारणावरून शिवसेनेच्या प्रभाग 11 (क) च्या नगरसेविका अनिता मगर यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश के. के. पाटील यांनी आज दिला. सौ. मगर यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी तक्रार दाखल झाल्याची बातमी "सकाळ'मध्ये 25 नोव्हेंबर 2017 रोजी प्रसिद्ध झाली होती. 

सौ. मगर यांना तीन अपत्यं असून, पैकी दोन अपत्यं ही 1 सप्टेंबर 2009 नंतर झाली आहेत. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी मागणी भाजपच्या पराभूत उमेदवार भाग्यलक्ष्मी म्हंता यांनी केली होती. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये झाली. त्यावेळी प्रभाग 11 (क) या जागेवरून सौ. मगर विजयी झाल्या. प्रसिस्पर्धी म्हंता यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. सौ. मगर यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये दोन पेक्षा जास्त अपत्ये नसल्याचा उल्लेख केला आहे. प्रत्यक्षात त्यांना तीन अपत्यं असल्याने त्या महाराष्ट्र महापालिका निवडणूक अधिनियम 1949 मधील कलम 10 (आय) नुसार निवडणूक लढविण्यास अपात्र ठरतात. प्रतिज्ञापत्रावर खोटी माहिती देऊन त्यांनी शासनाची फसवणूक केली आहे, त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी सौ. म्हंता यांनी केली होती. 

सौ. मगर यांनी जोडलेले अपत्यांचे जन्मदाखले भारतीय पुरावा कायदा अन्वये सार्वजनिक मालमत्ता असून (पब्लिक डॉक्‍युमेंटस) या दाखाल्यांमध्ये अपत्याचे, आई-वडिलांचे व जन्मतारखा पाहिल्या असता सौ. मगर यांचे नगरसेवकपद रद्द करणे योग्य होईल,असा दावा सौ. म्हंता यांच्या वतीने करण्यात आला. या संदर्भात पुरावे तपासले असता कुमारी पूनम ही सौ. मगर यांचीच कन्या असल्याचा निष्कर्ष काढला व सौ. म्हंता यांची मागणी मान्य करीत, सौ. मगर यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश दिले. या दाव्यात सौ. म्हंता यांच्या वतीने ऍ. नीलेश ठोकडे, ऍड. मळसिद्ध देशमुख, ऍड. रवींद्र चलवादी, ऍड. मल्लिकार्जुन कादाडी, ऍड. सुप्रिया बिराजदार यांनी, महापालिकेतर्फे ऍड. उज्वलसिंह रजपूत, तर सौ. मगर यांच्याकडून ऍड. एस. एस. उंबरजे यांनी काम पाहिले. 

जिल्हा न्यायालयाच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. त्या ठिकाणी आम्हाला निश्‍चित न्याय मिळेल. 
- अनिता मगर, नगरसेविका

Web Title: ShivSena corporater post cancelled in Solapur