esakal | कोल्हापुरात विधानसभेला मतांच्या टक्केवारीत कोण ठरले भारी ?
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena got Highest Vote in Vidhansabha Election

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी, तर भाजप-सेनेची युती होती. आघाडीत काँग्रेसला सात, तर राष्ट्रवादीला तीन जागा आल्या. काँग्रेसने शाहूवाडीत उमेदवारच दिला नाही, तर शिरोळची जागा आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ‘स्वाभिमानी’ला सोडली.

कोल्हापुरात विधानसभेला मतांच्या टक्केवारीत कोण ठरले भारी ?

sakal_logo
By
निवास चौगले

कोल्हापूर - जिल्ह्यात विधानसभेच्या सर्वाधिक जागा लढवून अवघ्या एका जागेवर विजय मिळविताना पाच विद्यमान आमदारांना पराभव स्वीकारावा लागलेली शिवसेना मतांच्या टक्केवारीत सर्वांत भारी पडली आहे.

शिवसेनेला सर्वाधिक तब्बल २६.६३ टक्के मते मिळाली आहेत. पाच जागा लढवून चार जागांवर विजय मिळविलेल्या काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत; तर सेनेसोबत युती असल्याने केवळ दोनच जागा वाट्याला येऊन त्याही ठिकाणी पराभूत झालेल्या भाजपला अपेक्षेपेक्षाही कमी मते मिळाली आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी, तर भाजप-सेनेची युती होती. आघाडीत काँग्रेसला सात, तर राष्ट्रवादीला तीन जागा आल्या. काँग्रेसने शाहूवाडीत उमेदवारच दिला नाही, तर शिरोळची जागा आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ‘स्वाभिमानी’ला सोडली. युतीत भाजपवर कुरघोडी करताना सेनेने युतीची घोषणा होण्यापूर्वीच विद्यमान सहा आमदारांसह आठ जागांवर थेट उमेदवारांची घोषणा केली, त्यामुळे भाजपच्या वाट्याला केवळ इचलकरंजी व कोल्हापूर दक्षिण हे विद्यमान आमदार असलेले मतदारसंघच वाट्याला आले. 

गेल्या निवडणुकीत एकही जागा न मिळालेल्या काँग्रेसने यावेळी तब्बल चार जागा जिंकल्या. राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या तीनपैकी दोन जागांवर पक्षाने विजय मिळवला. शिरोळ, इचलकरंजीत अपक्षांनी बाजी मारली, तर शाहूवाडीतून ‘जनसुराज्य’चे संस्थापक डॉ. विनय कोरे यांनी गड शाबूत ठेवला.

सहा विद्यमान आमदार असलेल्या शिवसेनेला या निवडणुकीत चांगलाच दणका बसला. त्यांचे पाच आमदार तर पराभूत झालेच; पण कागल, चंदगडमधील उमेदवारांचाही पराभव झाला. अशीच अवस्था भाजपची झाली. भाजपचे दोन्हीही उमेदवार पराभूत झाले. युतीच्या दहापैकी नऊ उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला. राधानगरीतून शिवसेनेचे प्रकाश आबिटकर हे एकमेव उमेदवार विजयी झाले.

निकालात आहे त्या जागाही राखता न आलेली सेना मतांच्या टक्केवारीत मात्र आघाडीवर आहे. सेनेपाठोपाठ काँग्रेसला मते मिळाली, तर सर्वच मतदारसंघांतील अपक्षांना मिळून तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी चौथ्या स्थानावर, जनसुराज्य पाचव्या स्थानावर, तर भाजप सहाव्या स्थानावर आहे. एकच जागा लढवलेल्या स्वाभिमानीची इतर मतदारसंघातील मते आघाडीच्या उमेदवारांना गेल्याचे गृहीत धरावे लागेल. नऊ मतदारसंघांत उमेदवार उभा केलेल्या वंचित बहुजन आघाडीला सातव्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. भाकप, शेतकरी कामगार पक्ष, मनसे, स्वराज्य इंडिया, ताराराणी पक्ष, एमआयएम, अखिल भारतीय हिंदू महासभा आदी पक्षांनी प्रत्येकी एक जागा लढवली; पण त्यांना मिळालेली मते दखल घेण्यासारखी नाहीत. 

युती आघाडीवरच पण तरीही धुव्वाच

विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची आघाडी, तर सेना-भाजपची युती होती. आघाडीबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनाही होती. या आघाडी, युतीच्या मतांची बेरीज केली तर युतीला सर्वाधिक ३६.७३ टक्के मते मिळाली आहेत; तर आघाडीला सर्वांची मिळून ३३.१४ मते मिळाली. मतांची टक्केवारी कमी असूनही विजयात मात्र आघाडीच सरस ठरली असून, मते जास्त मिळूनही युतीचा धुव्वा उडाला.

पक्षनिहाय मिळालेली मते (एकूण वैध मते - २२,८९,८३५)

पक्ष मिळालेली मते
शिवसेना ६,०९,७९०  
काँग्रेस ४,४७,८१३            
अपक्ष ४,३७,४४२
राष्ट्रवादी २,५९,४४५
जनसुराज्य १,९६,२८४
भाजप   १,६४,४७०
वंचित ८४,०४७
स्वाभिमानी ५१,८०४
बसपा ६,९१३