शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे बेळगावशीही घनिष्ठ नाते : Belguam Babasaheb Purandare Memories | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivshahir Babasaheb Purandare

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे बेळगावशीही घनिष्ठ नाते

बेळगाव : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Shivshahir Babasaheb Purandare)यांच्या अंतरंगातील गाव म्हणजे बेळगाव (Belguam) त्यामुळेच ते अनेकदा विश्रांतीसाठी बेळगावला येत होते. तसेच जाणता राजाचे (Janta Raja) बेळगावात दोन वेळा नाट्य प्रयोग झाले. त्या दोन्ही वेळीही शिवप्रेमींनी या महानाट्याला प्रचंड प्रतिसाद दिला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाल्याची माहिती मिळताच शहरातील अनेकांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या जाण्यामुळे बेळगावकरांचेही मोठे नुकसान झाले असून, त्यांच्यामुळेच बेळगावात महाराष्ट्र पेक्षाही शिवाजी महाराजांवर निष्ठा बाळगणाऱ्या पिढ्या निर्माण झाल्या अशा शब्दात मत व्यक्त केले आहे.

1971 मध्ये युनियन जिमखान्यावर पुरंदरे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या व्याख्यानाला प्रचंड गर्दी होती. व्याख्यान सुरू होण्यापूर्वीच अर्धा ते एक तास पूर्ण मैदान भरून जात होते. पहिल्या व्याख्यानाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर 1974 मध्ये पुन्हा व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळीही नागरिक मोठ्या संख्येने व्याख्यानाला हजर होते. त्यानंतर काही वर्षांनी बेळगावात जाणता राजाचे दोन वेळा प्रयोग पार पडले होते. यावेळी प्रत्येक प्रयोगाला मोठी गर्दी होत होती. तसेच ग्रामीण भागातूनही शिवप्रेमी अधिक संख्येने येत असल्याने परिवहन मंडळाकडून रात्रीच्यावेळी विशेष बसची सोय करावी लागली होती.

पुरंदरे यांच्या व्याख्यानामुळेच शिवाजी महाराज बेळगावातील घराघरात पोहोचले. तसेच त्यांच्या पासून प्रेरणा घेऊन अनेकजण गड किल्ल्यांसाठी आजही कार्यरत आहेत. त्यांच्या जाण्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून काढण्याची जबाबदारी शिवप्रेमिना घ्यावी लागेल. असे मत व्यक्त होत आहे.

हेही वाचा: असा होता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा सांगलीशी ऋणानुबंध 

बाबासाहेब पुरंदरे यांचे बेळगावशी घनिष्ठ संबंध होते. तसेच त्यांच्या अंतरंगातील गाव असल्याने पुरंदरे अनेकदा विश्रांतीसाठी बेळगावला येत होते याची माहिती कोणालाही नसायची. मात्र काही मोजक्या मंडळींसोबत त्यांना भेटायला जात होतो. त्यांचा ज्यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते दिल्ली येथे सत्कार होणार होता. त्यावेळी पुरंदरे हे व्याख्यानासाठी बेळगावला होते या ठिकाणीच त्यांना दिल्लीला येण्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर ते बेळगावमधूनच दिल्लीला निघून गेले होते. त्यांनी बेळगाव परिसरातील अनेक गड-किल्ल्यांना भेटी दिल्या. बेळगावचे मराठीपण प्युवर असल्याचे त्यांना वाटत होते. त्यामुळेच वडगाव येथील युवकांनी पुढाकार घेऊन जाणता राजा सादर केला त्यावेळी त्यांना बाबासाहेबांनी आशीर्वाद दिले होते.

प्रा. अनिल चौधरी, शिव व्याख्याते

बाबासाहेब पुरंदरे अनेकदा बेळगावला येत होते. 1971 व 1974 मध्ये त्यांची युनियन जिमखाण्यावर व्याख्याने झाली होती. हे व्याख्यान ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी होत होती त्यानंतर ते आपल्या ओघवत्या शैलीत शिवरायांचा इतिहास सर्वांसमोर मांडत होते. ज्ञान प्रबोधन शाळेच्या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित राहण्याची संधी मिळाली होती. पुरंदरे यांच्यामुळे घराघरात छत्रपती शिवाजी महाराज पोहोचले त्यांच्या जाण्याने बेळगावकरांचेही मोठे नुकसान झाले आहे.

मालोजी अष्टेकर, माजी महापौर

loading image
go to top