धक्कादायक ः नवोदयमधील विद्यार्थिनींना जाळण्याचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

टाकळी ढोकेश्‍वर येथे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेले नगर जिल्ह्यातील एकमेव जवाहर नवोदय विद्यालय आहे. हे विद्यालय संपूर्ण निवासी आहे.

पारनेर : तालुक्‍यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या वसतिगृहात झोपलेल्या विद्यार्थिनींना गादीसह पेटवून देऊन जाळण्याचा प्रयत्न झाला. त्यात वैष्णवी भांगरे (रा. बोधेगाव, ता. शेवगाव) ही विद्यार्थिनी गंभीर भाजली असून, तीन विद्यार्थिनी त्यातून सुखरूप बचावल्या. बुधवारी (ता. 29) मध्यरात्रीच्या सुमारास घडलेली ही घटना आज उघड झाली. 

हेही वाचा - राष्ट्रवादी पडली आबांच्या मुलाच्या प्रेमात 

जखमी विद्यार्थिनी शेवगावची 
याबाबत माहिती अशी ः टाकळी ढोकेश्‍वर येथे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेले नगर जिल्ह्यातील एकमेव जवाहर नवोदय विद्यालय आहे. हे विद्यालय संपूर्ण निवासी आहे. विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या वैष्णवी भांगरे (इयत्ता अकरावी), ऋतुजा घाडगे (अकरावी), राजनंदिनी भिसे (सहावी) आणि प्राजक्ता पोटे (इयत्ता सहावी) या विद्यार्थिनी वसतिगृहातील एका खोलीत बुधवारी रात्री झोपल्या होत्या. मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मुली झोपलेल्या गाद्या पेटवून दिल्या. यात वैष्णवी हिची गादी पेटली व तिचा पाय व हात भाजला. तिने आरडाओरडा केल्याने अन्य तिघी पळाल्यामुळे बचावल्या. 

याबाबत प्राचार्य एस. पी. बोरसे यांनी पारनेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी घटनास्थळी पाहणी करून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात विद्यालयातील कंत्राटी महिला कामगाराचा जबाब पोलिसांनी नोंदविला आहे. विद्यालयानेही चौकशी समिती नेमल्याचे प्राचार्य बोरसे यांनी सांगितले. 

विद्यार्थिनीमधील वादातून घटना? 
ही घटना अकरावीच्या विद्यार्थिनींच्या आपसांतील वादातून घडली असावी, अशी शक्‍यता प्राचार्य बोरसे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये वाद असल्यानेच ही घटना घडली असे पालकांचे मत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, जखमी वैष्णवीवर जिल्हा रुग्णालयात उपचार करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

प्राचार्यांची कारही जाळली होती 
याच विद्यालयात प्राचार्य बोरसे यांची कार (एमएच 18 एजे 3412) 19 जानेवारी रोजी पेटवून देण्यात आली होती. प्राचार्य त्या वेळी नवी दिल्ली येथे कार्यालयीन कामासाठी गेले होते. मात्र, त्या घटनेची कुठेही वाच्यता झाली नव्हती. प्राचार्य बोरसे यांनी आजच्या घटनेसोबतच त्या घटनेचीही तक्रार पोलिसांत नोंदविली आहे. पोलिसांकडून आता दोन्ही घटनांचा तपास सुरू झाला आहे. 

याला जबाबदार कोण? 
नवोदय विद्यालयात सुमारे सहाशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यात 180 मुली आहेत. सर्व मुले व मुली विद्यालयाच्या वसतिगृहातच राहतात. घटना घडली, त्या मुलींच्या वसतिगृहातील संबंधित खोलीत 24 मुली राहत होत्या. त्या सर्वांच्या गाद्या पेटल्या असत्या, तर मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती व्यक्त करून, याला जबाबदार कोण, असा प्रश्न पालकांमधून विचारला जात आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking: Attempts to burn students in Navodaya

टॅग्स