जिल्ह्यात श्रवण यंत्रांचा तुटवडा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

सातारा - महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून दिल्या जाणाऱ्या श्रवण यंत्रांचा तुटवडा असल्याने यंत्रांसाठी रुग्णांना सहा-सहा महिने थांबावे लागत आहे. त्यामुळे योजनेची "असून अडचण नसून खोळंबा,' अशी परिस्थिती झाली आहे. 

सातारा - महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून दिल्या जाणाऱ्या श्रवण यंत्रांचा तुटवडा असल्याने यंत्रांसाठी रुग्णांना सहा-सहा महिने थांबावे लागत आहे. त्यामुळे योजनेची "असून अडचण नसून खोळंबा,' अशी परिस्थिती झाली आहे. 

काही नागरिकांना उपजत ऐकू कमी येण्याची समस्या असते. काहींना वयोमानानुसार ऐकायला कमी येते. तर, काहींना अपघाताने मार लागल्यानंतर श्रवण क्षमतेवर परिणाम होतो. विशेषतः औद्योगिक क्षेत्रामध्ये जास्त आवाज असणाऱ्या ठिकाणी अनेक वर्षे काम करणाऱ्या कामगारांना हा त्रास होत असतो. ऐकू कमी येणाऱ्या रुग्णांची श्रवणक्षमता वाढविण्यासाठी श्रवण यंत्र हा परिणामकारक उपाय आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये असे रुग्ण आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी श्रवणक्षमता चाचणीसाठी त्यांना पाठवतात. जिल्हा रुग्णालयात सध्या श्रवणक्षमता चाचणी मशिन उपलब्ध आहे. त्याच्या सहायाने संबंधित रुग्णाची श्रवणक्षमता किती आहे, हे ठरविले जाते. तसेच त्याला कोणत्या क्षमतेचे श्रवण यंत्र लागेल, हे सांगितले जाते. 

श्रवण क्षमतेतील दोषामुळे संबंधित व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असतो. ती वाढविण्यासाठी श्रवण यंत्र चांगला उपाय आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून ही श्रवण यंत्रे रुग्णांना पुरविली जातात. वैद्यकीय चाचणीमध्ये आवश्‍यकता स्पष्ट झाल्यावर संबंधित रुग्णाला महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये नोंदणी करावी लागते. ही नोंदणी केल्यानंतर यंत्राच्या उपलब्धतेनुसार संबंधित रुग्णाला हे यंत्र बसविले जाते. नोंदणी करताना एक-दोन महिन्यांमध्ये यंत्र उपलब्ध होईल, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र सहा-सहा महिने रुग्णाला यंत्र मिळत नाही. त्यामुळे तातडीची गरज असणाऱ्या रुग्णांना खासगी ठिकाणाहून यंत्राची खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे योजनेचा फायदा काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. आवश्‍यकतेनुसार तातडीने श्रवण यंत्र उपलब्ध करून देण्याची मागणी रुग्णांकडून होत आहे. 

उपलब्ध निधीतून 75 यंत्रे खरेदी करणार 

मागील वर्षामध्ये उपलब्ध निधीमध्ये श्रवण यंत्रांची खरेदी केली होती. 73 लोकांना मशिन बसविण्यात आली. आता यंदा उपलब्ध झालेल्या निधीतून आणखी 75 यंत्रे खरेदी करण्यात येणार आहेत. रुग्णांना तातडीने यंत्रे उपलब्ध करून दिली जातील, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

Web Title: Shortage of hearing aids in the satara district