कोरफळे येथे दीड हजार लोकांचे श्रमदान

सुदर्शन हांडे
गुरुवार, 3 मे 2018

बार्शी - कोरफळे (ता.बार्शी) येथे सुरू असलेल्या पाणी फाऊंडेशनच्या जलसंधारण कामासाठी १ मे महाराष्ट्र दिनी आयोजित महाश्रमदानात दीड हजार लोकांनी श्रमदान करून ८०८ घन मीटर इतके काम केले. या कामातून तब्बल ८० लाख लिटर पाणी साठवण होणार असल्याचे तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी सांगितले. 

बार्शी - कोरफळे (ता.बार्शी) येथे सुरू असलेल्या पाणी फाऊंडेशनच्या जलसंधारण कामासाठी १ मे महाराष्ट्र दिनी आयोजित महाश्रमदानात दीड हजार लोकांनी श्रमदान करून ८०८ घन मीटर इतके काम केले. या कामातून तब्बल ८० लाख लिटर पाणी साठवण होणार असल्याचे तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी सांगितले. 

१ मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून कोरफळे गावात महाश्रमदान कार्यक्रम घेण्यात आला. या श्रमदानासाठी हांडे गल्ली युवा प्रतिष्ठान, भारतीय जैन संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, रोटरी क्लब, आर.के. क्लब, महाराष्ट्र बँक कर्मचारी, एल आय सी कर्मचारी, मुंबई-पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते, तलाठी, तहसील कार्यालय कर्मचारी, पोलीस पाटील, रेशन दुकानदार तसेच कोरफळे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. श्रमदानासाठी उपस्थित सर्व लोकांचे वेगवेगळे गट करून त्यांना शेततळे, सलग समतल चर, गाळ काढणे आदी कामाचे वाटप करण्यात आले होते. 

श्रमदानास उपस्थित लोकांनी वाटून दिलेले काम सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत केले. यात दोन शेततळे, सीसीटी, नाल्यातील गाळ काढणे, ढाळीचे बांध करणे अशी अनेक कामे करण्यात आली. या कामाचे मोजमाप केले असता ८०८ घन मीटरची हे काम झाले असून यातून प्रत्येक पावसात ८ लाख लिटर पाणी साठवण होणार आहे. तसेच पूर्ण पावसाळ्यात मोठया प्रमाणात पाणी जमिनीत मुरवून ८० लाख लिटर पाणी साठवण शक्य होणार असल्याचे पाणी फाऊंडेशनच्या तज्ञांनी सांगितले. 

या आलेल्या स्वयंसेवकांसाठी कोरफळे गावकऱ्यांनी चहा-नाश्त्याची सोय कामाच्या जागेवरच केली होती. तर काम संपल्यावर ग्रामदैवत यमाई देवी मंदिरात सर्वांच्या भोजनाची सोय करण्यात आली होती. डोंगरावर जलसंधारणासाठी नैसर्गिक साईट असलेल्या ठिकाणी काम व नंतर निसर्गाच्या सानिध्यात यमाई देवीच्या मंदिरामागे वन भोजन यामुळे शहरातून आलेल्या अनेकांना छोट्याशा सहलीचा आनंद मिळाला.

Web Title: Shramdan of one and a half thousand people at Korfale