श्रीगोंदेत नगरपालिका निवडणुकीचे पडघम

संजय आ. काटे
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

श्रीगोंदे : पुढील वर्षी पहिल्याच महिन्यात होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. सत्ताधारी भाजपकडून इच्छुकांनी जेवणावळीसह सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरवात केली आहे. दुसरीकडे काही नगरसेवक परदेशात आराम करीत आहेत. काँग्रेसनेही बैठकांचा जोर वाढविला असून, ताकद दाखविण्याची तयारी सुरू केली आहे. 

श्रीगोंदे : पुढील वर्षी पहिल्याच महिन्यात होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. सत्ताधारी भाजपकडून इच्छुकांनी जेवणावळीसह सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरवात केली आहे. दुसरीकडे काही नगरसेवक परदेशात आराम करीत आहेत. काँग्रेसनेही बैठकांचा जोर वाढविला असून, ताकद दाखविण्याची तयारी सुरू केली आहे. 

पालिकेतील सत्ताधाऱ्यांची मुदत जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात संपत आहे. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याचे संकेत आहेत. त्यादृष्टीने इच्छुक उमेदवार व त्यांचे नेते तयारीला लागले आहेत. सत्ताधारी भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी अर्धा डझन इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांची तयारीही त्याच पद्धतीने सुरू आहे. आषाढात 55 बोकडांचा बळी देत एका इच्छुकाने "किसमे कितना हैं दम' असे दाखवीत नेत्यांपुढे धर्मसंकट उभे केले. दुसऱ्याने संगीत मैफल ठेवून "हम भी है तैयार' दाखवून दिले. 

नगराध्यक्ष मनोहर पोटे वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी मोठ्या अभिनेत्रीला आणून निवडणुकीतील "दादा'गिरी दाखविण्यास उत्सुक असल्याचे समजले. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर विरोधी काँग्रेसने दोन दिवसांपूर्वी निवडणुकीबाबत बैठक घेतली. त्यात प्रमुख नेत्यांनी दोन्ही कॉंग्रेसची आघाडी होणार असल्याची खात्री देतानाच "नगराध्यक्ष मात्र आमचाच' होणार, असे सांगत अप्रत्यक्ष आघाडीतील नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली. 

काँग्रेसकडे सध्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या जास्त नसलीतरी भाजपमधील नाराजीची संधी शोधण्यासाठी नेत्यांनी जाळे टाकल्याचे बोलले जाते. शिवसेनेनेही शहरात संपर्क वाढविला असला, तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये ताळमेळ नसल्याचेच चित्र आहे. या पक्षाचे आमदार असले, तरी शहरातील त्यांचे कार्यकर्ते बेचैन आहेत. त्यामुळे पालिका निवडणूक पूर्वतयारीतून "राष्ट्रवादी' गायब असल्याचे दिसते. 

नगराध्यक्ष बदलाची शक्‍यता धूसर 

निवडणुकीत सर्वार्थाने घाम निघणार असल्याने नगराध्यक्षांसह त्यांचे काही सहकारी सध्या परदेशवारीवर आहेत. शहरवासीय रस्त्यावरील चिखलाने हैराण असताना, ते तेथील आरामदायी वातावरणाचे छायाचित्र सोशल मीडियावर टाकत आहेत. विशेष म्हणजे, नगराध्यक्ष बदलावरून नाराज नगरसेवकही नगराध्यक्षांसोबत असल्याने आता बदल होत नाही, हेही अधोरेखित होते.

Web Title: In Shrigonde Corporation Elections Ahead