नीलिमा मिश्रांचे कार्य तरुणाईसाठी प्रेरक - श्रीनिवास पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

कोल्हापूर - स्वत:ची ओंजळ ही घेण्यासाठी नव्हे, तर दुसऱ्याला देण्यासाठी हवी, याचा कृतीतून दाखला देणाऱ्या पद्मश्री नीलिमा मिश्रा यांचे कार्य आजच्या तरुणाईसाठी प्रेरक आहे, असे गौरवोद्‌गार सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी येथे काढले.

कोल्हापूर - स्वत:ची ओंजळ ही घेण्यासाठी नव्हे, तर दुसऱ्याला देण्यासाठी हवी, याचा कृतीतून दाखला देणाऱ्या पद्मश्री नीलिमा मिश्रा यांचे कार्य आजच्या तरुणाईसाठी प्रेरक आहे, असे गौरवोद्‌गार सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी येथे काढले.

ताराराणी विद्यापीठातर्फे डॉ. व्ही. टी. पाटील यांच्या चोविसाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित भद्रकाली ताराराणी पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. पद्मश्री नीलिमा मिश्रा यांना श्री. पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ५१ हजार रुपयांचा धनादेश, शाल, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. श्री. पाटील यांनी आपल्या खुमासदार शैलीत उपस्थितांशी संवाद साधला. 

डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनमध्ये कार्यक्रम झाला. श्री. पाटील म्हणाले, ‘‘वयाच्या तेराव्या वर्षी नीलिमा यांना सामाजिक भान येणे, ही महत्त्वाची बाब आहे. त्यांचा महिलांच्या सक्षमीकरणाचा विचार मोठा आहे. कष्टाच्या जगण्यातून त्यांनी अनेक महिलांचे संसार उभे केले. वस्तू तयार करण्यासह त्यांनी महिलांना मार्केटिंगचे तंत्रही शिकविले आहे. त्यांनी महिलांना रोजगार मिळवून दिल्याने महाराष्ट्रात त्यांच्या महिला मार्केटिंग करीत आहेत. महिलांसाठी काम करताना कोणत्याही जाहिरातीचे त्यांना आकर्षण नव्हते.’’ 

‘हात मत फैलाना’ संदेश ठरला मोलाचा
नव्या चिंध्यांतून शिवलेल्या गोधड्या इंग्लंड, अमेरिकेल्या गेल्या. ‘वर्क कल्चर’ विकसित झाले. आज स्टॉलवर उभ्या राहण्यास घाबरणाऱ्या महिला महाराष्ट्रात मार्केटिंग करतात. ‘अम्मा’ने ‘हात मत फैलाना’ हा दिलेला संदेश मोलाचा ठरला. तिला उपाशी लोकांविषयी जिव्हाळा होता. तीन गावांत ४० लोक एकटे राहत होते. त्यांना डबे पोचविण्याचे काम केले. हे काम आता मोठी बहीण करीत आहे, असे मिश्रा यांनी सांगितले.

श्रीमती मिश्रा म्हणाल्या, ‘‘हा पुरस्कार म्हणजे ग्रामीण भागातील ताराराणींचा केलेला गौरव आहे. माझी पहिली शिक्षिका अम्मा हिच्या संस्कारातून वंचितांसाठी काय करता येईल, याचा विचार तेराव्या वर्षी केला होता. शाळेतील मैत्रीण, शेतकरी यांच्या कष्टमय जीवनाच्या संवेदना मनात जाग्या झाल्या होत्या. देशभरातील संस्थांना भेटी दिल्यानंतर काय करायचे, याची यादी केली. समाजात हुशार माणसे असून, त्यांना उत्तरे माहीत आहेत, हे कळाले. फक्त त्यांना अनुकुल व्यवस्था उभी करणे आवश्‍यक असते.’’ 

त्या म्हणाल्या, ‘‘दुष्काळी भागात शासनाचे पैसे न घेता रोजगाराची कामे सुरू केली. उद्योग व पैसा उभारणीसाठी महिला पुढे आल्या. तेहतीस प्रकारच्या वस्तू बनविल्यानंतर त्यांचे प्रदर्शन भरविले. वस्तूंची विक्री महिलांनीच केली. शंभर महिला संगणक शिकल्या. त्यांनी एम्रॉयडरीचा कोर्सही पूर्ण केला. त्यामुळे ऐन दुष्काळात महिलांना तीन वर्षे काम मिळाले. जे अजूनही सुरू आहे.’’

राष्ट्रीय स्तरावर काम करताना थकल्यासारखे वाटले. मात्र, या पुरस्काराने उर्वरित लढाईसाठी ऊर्जा मिळाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. 
डॉ. सुजय पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. एस. डी. चव्हाण यांनी गौरवपत्राचे वाचन केले. या वेळी ए. आर. पर्वते, डॉ. एस. एन. पवार, प्राजक्त पाटील, पी. एम. हिलगे उपस्थित होते. 

Web Title: Shrinivas Patil comment