
यात्रेतील धार्मिक कार्यक्रम
सोमवार, 13 जानेवारी : यण्णीमज्जन : 68 लिंगांना तैलाभिषेक
मंगळवार, 14 जानेवारी : सम्मतिभोगी : संमती कट्ट्यावर अक्षता समारंभ
बुधवार, 15 जानेवारी : मकरसंक्रांत : होमप्रदीपन समारंभ
गुरुवार, 16 जानेवारी : किंक्रांत : होम मैदानावर शोभेचे दारूकाम
शुक्रवार, 17 जानेवारी : कप्पडकळ्ळी : नंदीध्वजांचे वस्त्रविसर्जन
सोलापूर : ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेला सोमवार (ता. 13)पासून सुरवात होत आहे. यंदा सिद्धेश्वर यात्रेत जवळपास 200 स्टॉल उभारण्यात येत असून भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना सुविधा देण्यासाठी देवस्थान समिती प्रयत्नशील असल्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
यात्रेच्या निमित्ताने सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, गुरुभेट व सोन्नलगी सिद्धेश्वर मंदिर तसेच सिद्धेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या 68 लिंगाच्या ठिकाणीही विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. 14 जानेवारी रोजी होणाऱ्या अक्षता सोहळ्याचे आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून धावते वर्णन ऐकविण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेस रामकृष्ण नष्टे, बाळासाहेब भोगडे, मल्लिनाथ जोडभावी, सिद्धेश्वर बमणी, गुंडप्पा कारभारी, आर. एस. पाटील, रेवणसिद्ध पाटील, सोमशंकर देशमुख, विश्वनाथ लब्बा, चिदानंद वनारोटे, विश्वनाथ आळंगे, महेश आंदेली आदी उपस्थित होते.
हेही वाचा - रेल्वेच्या धडकेत वृध्दाचा मृत्यु
पालखी व नंदीध्वजांची मिरवणूक
यात्रेच्या निमित्ताने सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडाचे प्रतीक असलेल्या नंदीध्वजांची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने निघेल. सिद्धेश्वरांच्या पालखीची मिरवणूक 13 ते 17 जानेवारी या कालावधीत निघेल. 13 जानेवारीला सकाळी आठ वाजता मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू मठातून मिरवणुकीला सुरवात होईल. ती ठरलेल्या मार्गाने सिद्धेश्वर मंदिरात जाईल. तेथून एक वाजता काठ्यांची मिरवणूक निघेल. ती 68 लिंगांना तैलाभिषेक करून प्रदक्षिणा घालून रात्री आठ वाजता हिरेहब्बू मठात परत येईल.
संस्कार भारती, कला फाउंडेशनची रांगोळी
संस्कार भारती व कला फाउंडेशनच्या वतीने यंदाही मिरवणूक मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात येणार आहेत. कसबा पेठेतील हिरेहब्बू मठापासून ते सिद्धेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्यापर्यंत पायघड्या असतील. गेल्या 19 वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे.
हेही वाचा - चर्चा भरणेंची वर्णी वळसे-पाटलांची
गड्डा यात्रेत मनोरंजनाचे स्टॉल
भारताच्या विविध भागांतील विक्रेते सिद्धेश्वर यात्रेत स्टॉल उभारणार आहेत. स्टॉलची संख्या जवळपास 200 असेल. गृहोपयोगी वस्तूंची दुकाने, हस्तकला, ज्वेलर्स यासह खाद्यपदार्थांची दुकाने, आकाशपाळणे, मौत का कुवॉं, लोखंडी ब्रेक डान्स, गाढवाची कसरत, मॅजिक शो, सेल बो, मिनी रेल, ड्रॅगन ट्रेन, हसी घर, डॉग शो, एअर इंडिया, डिस्ने लॅंड, टोराटोरा यासह अनेक करमणुकीचे साधने यात्रेत असतील.
सिद्धेश्वर सुकन्या, बटू दत्तक योजना
श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीने श्री सिद्धेश्वर सुकन्या दत्तक योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत एका मुलीचे एका वर्षासाठी पालकत्व घेण्यासाठी देवस्थानच्या वतीने 15 हजारांची देणगी स्वीकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर सिद्धेश्वर देवस्थान पौरोहित्य अभ्यासक्रम घेतला जात आहे. यामध्ये देणगीदाराने एका बटूला दत्तक घ्यावे यासाठी 15 हजारांची देणगी देवस्थानला द्यावी.
यात्रा दाखवणार सोशल मीडियावर
सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीने सिद्धेश्वर यात्रा सातासमुद्रापार पोचावी, यासाठी देवस्थान वेबसाइट, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरच्या माध्यमातून यात्रेचे अपडेट देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सिद्धेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगाची माहिती सोशल मीडियावर देण्यात येणार आहे.