सांगलीतील व्यापार पेठा सुन्न 

सांगलीतील व्यापार पेठा सुन्न 

सांगली - कृष्णाकाठच्या चार व्यापारी पेठा ही सांगलीची ओळख. या पेठा म्हणजे शहराचा जिवंतपणा; पण आज त्या पेठाच निपचित आहेत. येथे दिवाळीसारखी गर्दी आज लोटली आहे, ती खरेदी करते आहे. ब्रॅंडेड शोरुमचा मालक रस्त्यावर ओरडून-ओरडून कपडे विकतोय. जणू दिवाळी असावी, असे लोक खरेदी करताहेत; मात्र पेठांतील वातावरण शिमग्याचे आहे. व्यापारी कसेबसे सावरण्यासाठी "सेल' काढून माल हातावेगळा करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. 

कापडपेठ, हरभट रोड, गणपती पेठ आणि मारुती रस्ता, सराफ पेठ... सारेच सुन्न आहे. मागच्या आठवड्यात जो शर्ट बाराशे रुपयांना विकला तो आज 200 रुपयांना विकावा लागतोय. दोन हजारांची पॅंट पाचशेला आणि अडीच-तीन हजारांचे ब्रॅंडेड कुर्ते दोनशे-पाचशे रुपयांनी विकताना व्यापाऱ्यांच्या डोळ्यांत पाणी दाटलेय. भांड्याची दुकाने, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, मोबाईल, शोभेच्या वस्तू, क्रीडा साहित्य, कपडे, औषधे, शिलाई साहित्य, धान्य, डाळी, किराणा माल... शिल्लक काहीच नाही. ज्याला म्हणून महापुराचे पाणी लागलं, त्याची राख झाली आहे, अशी उद्विग्नता आहे.

खराब झालेला सारा माल कसातरी बाहेर काढावा, शक्‍य तेवढा वाचवावा, उरलेला फेकून द्यावा... नुकसान कितीचे? आता आकडा लगेच कसा सांगणार? कुणाला सांगणार? विमा संरक्षण नाही, शासन किती मदत करणार, अशा साऱ्या प्रश्‍नांची उत्तरे काहीच नाहीत. पंचनामा होणार आहे की नाही, कळवलेले नाही. आभाळ फाटलंय, ते शिवणार कसे आणि किती? 

व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा म्हणाले, ""कित्येक व्यापाऱ्यांनी दुकान उघडलेले नाही. संपल सारं, अशी त्यांची भावना आहे. दुकान उघडलं तर काहींना हार्ट ऍटॅक येईल, अशी भीती आहे. एकाला ऍटॅक आला. एका हॉटेल व्यावसायिकाने आत्महत्या केली. आता हे सारे उभे कसे करायचे?'' 

कापड व्यापारी गुरुनाथ खिलारे म्हणाले, ""कपडे, फर्निचर सारे संपले. रस्त्यावर येऊन कपडे विकावे लागतील, असे कधी वाटले नव्हते. कामगारांचा पगार भागेल, कपडेही खपतील, एवढ्या भावनेतून हा व्याप सुरू आहे.''  मोबाईल व्यापारी अजय नानवाणी म्हणाले, ""नुकसान भरून काढणे खूप कठीण आहे. फर्निचरही संपले आणि मालही. पुन्हा व्यापार उभा करण्यासाठी सारे धडपड करताहेत. किमान पंधरा दिवस हा संघर्ष सुरू राहील.'' 

""सर्वांनीच दुकाने वाचवण्याचा कसोशीने प्रयत्न केला; मात्र बहुतांश व्यापाऱ्यांना त्यात अपयश आले. वेळच मिळाला नाही. आमच्यासारख्यांना नुकसान कितीचे झाले असेल, हे सांगणे कठीण आहे. आर्थिक आहेच; पण त्याहीपेक्षा मानसिक धक्का मोठा आहे.'' 
- शरद सारडा,
मेमरीज फोटोज्‌ 

विमा प्रतिनिधी करताहेत अडवणूक 
व्यापारी पेठांतील सुमारे 25 टक्के दुकानांचा विमा आहे. तेथे विमा कंपन्यांचे प्रतिनिधी हजर झाले आहेत; मात्र ते अडवणूक करत आहेत. त्रास देण्यासारख्या अटी समोर टाकताहेत. अडवणूक करून "आमचं बघा', अशी ऑफर देत आहेत. मोडून पडलेल्या व्यापाऱ्यांकडूनही पैसे उकळण्याचा धंदा सुरू आहे, असा आरोप व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com