लॉकडाउनमुळे रेशीम उद्योग संकटात 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 April 2020

"कोरोना' मुळे लॉकडाउन सुरू असल्यामुळे सांगली जिल्ह्यातील रेशीम उद्योगावर संकट कोसळलेय. बाजारपेठा बंद असल्यामुळे तयार रेशीम कोष कोठे विकायचे असा गंभीर प्रश्‍न रेशीम उत्पादकांसमोर निर्माण झाला आहे. 

रांजणी ः "कोरोना' मुळे लॉकडाउन सुरू असल्यामुळे रेशीम उद्योगावर संकट कोसळलेय. बाजारपेठा बंद असल्यामुळे तयार रेशीम कोष कोठे विकायचे असा गंभीर प्रश्‍न रेशीम उत्पादकांसमोर निर्माण झाला आहे.

रेशीम उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अनुदान देऊन उद्योग वाढवण्याचा प्रयत्न केला. आहे. अनेक तरुण, सुशिक्षित मुले व्यवसायाकडे आकर्षित झाली. रेशीम उद्योगासाठी प्रथम अंडीपुंज म्हणजेच अळ्या विकत आणाव्या लागतात. त्यांना शेडमध्ये ठेवून तुतीचा पाला खाद्य म्हणून दिला जातो. पूर्ण कोश तयार होण्यास 28 ते 30 दिवस लागतात. नंतर कोश कर्नाटकातील बंगळुरूजवळील रामनगर बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवले जातात. 

कर्नाटकातील बंगळुरू येथील रामनगर ही रेशीम कोष खरेदीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. सध्या कोरोनामुळे लॉकडाउन आहे. त्यामुळे उत्पादित केलेला माल कुठे विकायचा हा प्रश्न रेशीम उद्योजकांसमोर निर्माण झाल्याचे मत अलकुड (एस) येथील युवा रेशीम उद्योजक स्वप्नील ओलेकर आकाश नाईक, भारत गोरड, सचिन ओलेकर यांनी व्यक्त केले.

कवठेमंकाळ तालुक्‍यात अलकुड, रांजणी, नागज, ढालगाव व तालुक्‍यात रेशीम उद्योग मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचे होणारे नुकसान खूप मोठे आहे. शासनाने रेशीम उद्योजकांना नुकसान भरपाई म्हणून मदत द्यावी, अशी मागणी रेशीम उद्योग संघटनेचे कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष स्वप्नील ओलेकर यांनी केली आहे. 

शासनाने मदत करावी

रेशीम उद्योग मोठ्या संकटात आला आहे. शासनाने मदत करावी.

- स्वप्नील ओलेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Silk industry in crisis due to corona lockdown