साहेब, नराधमांना मारण्याची संधी द्या..

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जून 2016

कोल्हापूर - पोटच्या मुलीप्रमाणे तिला सांभाळलं, सैतानांनी छळून छळून मारलं, तिचं चप्पल फक्त माझ्या डोळ्यांसमोर दिसतंय, त्या चपलाने नराधमांना मारण्याची संधी द्या, साहेब... अशी मागणी हुंदके देत आज आत्महत्या केलेल्या पल्लवी बोडेकर हिची मोठी बहीण अर्चना जानकर यांनी पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्याकडे केली. भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे याबाबतचे निवेदनही त्यांना देण्यात आले. शिष्टमंडळाचे नेतृत्व सतीशचंद्र कांबळे यांनी केले. 

तरुणांच्या छेडछाडीला कंटाळून बोंद्रेनगर येथील पल्लवी गणपत बोडेकर हिने आत्महत्या केली. याप्रकरणी करवीर पोलिसांनी सहा जणांना अटक केली. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबतचे निवेदन आज भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना दिले. या वेळी मृत पल्लवीच्या दोन बहिणी उपस्थित होत्या. मोठी बहीण अर्चना हिने पल्लवीला त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी केली. या प्रकरणी तानाजी झोरे व राजू शेळके यांचीही चौकशी करा, अशी मागणी केली.
 
शिष्टमंडळाने या प्रकरणाशी संबंधितांनाही तत्काळ अटक करा, त्यांच्यावर 30 दिवसांत दोषारोपपत्र दाखल करा, मुलींच्या छेडछाडीविरोधात मोबाइल व्हॅन पूर्ववत चालू करा, शाळा महाविद्यालयात तक्रार पेट्या बसवा, तक्रारीसाठी टोलफ्री क्रमांक सुरू करा, त्याबाबत प्रबोधन करा आणि पीडित मुलींना शासनाकडून तत्काळ अर्थसहाय उपलब्ध करून द्या, अशी मागणी केली. त्याचबरोबर आपटेनगर येथे पोलिस चौकशी बसवून बोंद्रेनगर रिंगरोडवर गस्त वाढवा, अशा मागण्या केल्या.
 
शिष्टमंडळात अनिल चव्हाण, मीना चव्हाण, दिलदार मुजावर, सुवर्णा मिठारी, सर्जेराव पाटील, शिवानी पाटील, सुनंदा चव्हाण, गिरीष फौंडे, सुधा सरनाईक, निकिता बोडेकर, शुभांगी गावडे, पूजा बोडेकर, दीपाली बोडेकर, लक्ष्मी गावडे आदी उपस्थित होते.

तक्रारदार पुढे येत नाहीत
याप्रकरणी संशयितांना अटक केली आहे. कोणत्याही गुन्ह्यात तक्रारदार पुढे येत नाहीत. त्याचाच फायदा गुन्हेगारांना मिळतो, अशी खंत व्यक्त केली. यावर शिष्टमंडळातील काही महिला आम्ही तक्रार देण्यासाठी तयार असल्याचे त्यांना सांगितले. 

Web Title: Sir, give the opportunity to kill them