साहेब आम्ही व्याजाने पैसे काढतो 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 December 2019

नव्या कर्जमाफीत काय बदल करावेत याचा कानोसा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज सायंकाळी नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील एसबीआय बॅंकेच्या शाखेस भेट दिली.

सोलापूर : साहेब आम्ही व्याजाने पैसे काढतो, सोने गहाण ठेवतो, कर्जाची वेळेवर परतफेड करतो. आम्ही इमानदार राहून पण मागच्या कर्जमाफीत फक्त 25 हजार रुपयांचेच प्रोत्साहन मिळाले. या कर्जमाफीत नियमित कर्जदार शेतकऱ्यांची प्रोत्साहन रक्कम वाढवा अशी मागणी शेतकऱ्याने केली. आमचे कर्ज थकवितो म्हणजे आम्ही काय मुद्दाम करतो का? असा जाबच दुसऱ्या शेतकऱ्याने त्या नियमित कर्जदार शेतकऱ्याला विचारला. दोघांतील चर्चेचे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार यांनी ही चर्चा तत्काळ तेथेच थांबविली. 

हेही वाचा : विश्‍वास ठेवा! संस्था नोंदणी होते फक्त 53 रुपयातच 
नवीन कर्जमाफी सरसकट द्या
 
नव्या कर्जमाफीत काय बदल करावेत याचा कानोसा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज सायंकाळी नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील एसबीआय बॅंकेच्या शाखेस भेट दिली. यावेळी शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना हा प्रसंग उद्‌भवला. यावेळी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते बळिराम साठे, कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, एसबीआयच्या बॅंक मॅनेजर सुनीता घंटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आम्ही किती कर्ज घेतले याची माहिती बॅंकेकडे असताना तीच माहिती आमच्याकडून पुन्हा पुन्हा का मागून घेता? नवीन कर्जमाफी सरसकट द्या, आम्ही एकवेळ बॅंकेत जाऊ पण सीएससी केंद्रात नको रे बाबा... अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. 2008 च्या कर्जमाफीत बॅंक केंद्रबिंदू होता. आता नव्या कर्जमाफीत बॅंकेलाच केंद्रबिंदू करा, आमच्याकडे मनुष्यबळ आहे अशी मागणी एसबीआयचे कृषी विकास अधिकारी संदीप धस व विजय पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. आघाडी सरकारमधील कर्जमाफी व भाजप सरकारमधील कर्जमाफी याबद्दलची तुलनात्मक माहिती त्यांनी दिली. 

हेही वाचा : मूल दत्तक घ्यायचे आहे, तर मग अशी आहे प्रक्रिया 
डीसीसीत फक्त सी-केवायसी 

राष्ट्रीयकृत बॅंकेत असलेल्या ई-केवायसी प्रणालीची माहिती डॉ. भोसले यांनी स्वतः घेतली. स्वतःचे आधारकार्ड या शाखेत देऊन त्यांनी बायोमेट्रिक्‍स्‌ला अंगठा लावून या प्रणालीची खातरजमा केली. खातरजमा झाल्यानंतर समोरच उभा असलेल्या डीसीसीच्या कर्मचाऱ्याला डॉ. भोसलेंनी विचारले, तुमच्याकडे अशी यंत्रणा आहे का? डीसीसीत फक्त सी-केवायसी असल्याचे त्या कर्मचाऱ्याने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sir we withdraw interest