शिराळ्यात माघार, बंडाळीबद्दल उत्सुकता 

शिवाजीराव चौगुले - सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

शिराळा - तालुक्‍यात चार गट व 8 गणांसाठी 95 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी अर्ज माघारीचा दिवस आहे. नाराजांची मनधरणी नेत्यांना जिकिरीची ठरणार आहे. त्यांना आपलसं करण्यास इतर पक्षाच्या नेत्यांनी व्यूहरचना आखणे सुरू केले आहे. कोणाची माघार व कोणाचे बंड याबद्दल उत्सुकता आहे. 

भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्या गटाविरोधात माजी आमदार मानसिंगराव नाईक व सत्यजित देशमुख यांची आघाडी आहे. नंबर वन राहण्याच्या इराद्याने प्रत्येकांने संपर्क यंत्रणा सतर्क केली आहे. मनसे, शिवसेना, भाजप, कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडीने उमेदवार जाहीर करून प्रचार यंत्रणा राबवली आहे. स्पर्धेत नसलेल्या किंवा अडचणीचे ठरणाऱ्यांनी माघार घ्यावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. नाराजांना हेरून आपल्या गटात आणण्यासाठी शर्थ करावी लागणार आहे. कोणी एखादा फायद्याचा ठरणार असेल तेथे उमेदवारी कायम ठेवावी म्हणूनही त्याला रसद पुरवावी लागेल. तशा छुप्या हालचालींनी वेग घेतला आहे. 

भाजपसह आघाड्यांना विरोध म्हणून मनसे, शिवसेना, स्वाभिमानी, आरपीआय यांनी अर्ज दाखल केलेत. त्यातील किती शिल्लक राहणार यावर लढत दुरंगी, की बहुरंगी हे कळेल. पक्षाशी एकनिष्ठ राहूनही निराश झालेल्यांत परिवर्तनासाठी प्रयत्न सुरू झालेत. आज (ता. 13) चा दिवस अनेकांना सुखकर, काहींना धक्कादायक राहणार आहे.

Web Title: Siralyata district 95 application filed