"सरजी' तुरुंगातून आले अन्‌ राष्ट्रवादीला मतदान करून गेले 

प्रमोद बोडके
मंगळवार, 14 जानेवारी 2020

विजयराज डोंगरेंनी राखली भाजपची बूज 
आजच्या सभापती निवडीत भाजप व समविचारी आघाडीचे उमेदवार अतुल पवार, सुभाष माने, संगीता मोटे यांचा पराभव झाला. मोहोळमधील आष्टी गटाचे सदस्य विजयराज डोंगरे भाजप व समविचारीकडून विजयी झालेले एकमेव उमेदवार आहेत. डोंगरे हे भीमा-लोकशक्ती आघाडी म्हणून जिल्हा परिषदेचे सदस्य झाले आहेत. नंतरच्या काळात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. डोंगरे यांच्या रूपाने जिल्हा परिषदेच्या राजकारणात त्यांनी भाजपची बूज राखली आहे. 

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत समविचारीच्या मदतीने राष्ट्रवादीचा पराभव करणाऱ्या भाजपला आज त्यांच्याच सदस्यांनी जोरदार झटका दिला. पंढरपूर तालुक्‍यातील गोपाळपूर गटाचे भाजप सदस्य गोपाळ अंकुशराव ऊर्फ सरजी हे तुरुंगात आहेत. न्यायालयाच्या आदेशाने ते आज विषय समिती सभापतीच्या निवडीला हजर राहिले. त्यांनी चारही मते राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शेकापच्या उमेदवारांना दिली आहेत. पंढरपूर तालुक्‍यातील भाजपच्या सदस्या रुक्‍मिणी ढोणे यांनी आजच्या सभेलाच दांडी मारल्याने सभापती निवडीत भाजपला जबरदस्त झटका बसला. 

aschim-maharashtra/chandrakant-dada-realized-mahadik-pattern-sangli-marathi-news-252259">हेही वाचा - चंद्रकांतदादांनी जाणला "हा' महाडिक पॅटर्न 
जिल्हा परिषदेच्या विषय समिती निवडीत आज राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शेकाप या मित्रपक्षांना चार पैकी तीन समित्यांवर विजय मिळविता आला आहे. भाजप व समविचारी आघाडीला फक्त एका समितीवर वर्चस्व मिळविता आले आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादी व भाजप-समविचारीमध्ये असलेली मतांची तफावत आज कमी झाली होती. भाजप व समविचारीचे समाजकल्याण समितीचे उमेदवार सुभाष माने व राष्ट्रवादी-शेकापच्या उमेदवार संगीता धांडोरे यांना समसमान 33 मते मिळाली. अंकुशराव व ढोणे ही हक्काची मते गमावल्याने माने यांचा पराभव झाल्याचे समोर आले आहे. समसमान मतानंतर माने व धांडोरे यांच्या चिठ्ठी काढण्यात आली. चिठ्ठीद्वारे धांडोरे यांना संधी मिळाली. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे नियोजन करण्याची जबाबदारी कोणही घेतली नव्हती. विषय समिती सभापती निवडीसाठी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र अपक्ष जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पुढाकार घेतला होता. त्यांचाच आज झालेला पराभव अनेकांना आश्‍चर्यकारक वाटला. 
हेही वाचा - माळशिरसच्या बंडखोर सदस्यांची सोमवारी सुनावणी 
झेडपीमध्ये कमळ पराभूत 
2017-12 या पंचवार्षिकमध्ये भाजपने आपल्या सदस्यांची ताकद वापरून पहिल्यांदा अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना अध्यक्ष केले. दुसऱ्यावेळी सदस्यांची ताकद शिवसेना सदस्य अनिरुद्ध कांबळे यांच्यासाठी वापरून त्यांना अध्यक्ष केले. कमळाच्या चिन्हावर विजयी झालेल्या सदस्यांसाठी काहीही नको असा आग्रह भाजपने धरला होता. आज महिला बालकल्याण समिती सभापतिपदासाठी भाजपने चिन्हावरील उमेदवार माळशिरस तालुक्‍यातील मांडवे गटाच्या सदस्या संगीता मोटे यांना मैदानात उतरविले. दुसऱ्यांना दोनदा अध्यक्ष उपाध्यक्ष करणाऱ्या भाजपला आज अधिकृतरीत्या जिल्हा परिषदेत सभापती निवडीत पराभूत व्हावे लागले. मोटे यांना 31 तर त्यांच्या विरोधातील कॉंग्रेसच्या सदस्या स्वाती शटगार यांना 35 मते मिळाली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sirji came out of jail and voted for the NCP