एवढ्याशा वयातही दिली मृत्यूशी झूंज पण...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

मृत्यूशी दोन हात करताना अखेर दीड वर्षाच्या विशाल लक्ष्मण शिंदे (सध्या रा. पट्टणकोडोली ता. हातकणंगले, मूळ रा. हिवरा भादली, ता. घळसंगी, जि. जालना) याचे प्रयत्न अपुरे ठरले.

कोल्हापूर - मृत्यूशी दोन हात करताना अखेर दीड वर्षाच्या विशाल लक्ष्मण शिंदे (सध्या रा. पट्टणकोडोली ता. हातकणंगले, मूळ रा. हिवरा भादली, ता. घळसंगी, जि. जालना) याचे प्रयत्न अपुरे ठरले. खेळताना सापडलेली कीटकनाशकाची बाटली तोंडात घातल्याने गेले काही दिवस त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू होते. डॉक्‍टरांनीही अथक प्रयत्न सुरू ठेवले होते. मात्र त्यांच्याही प्रयत्नाला यश आले नाही. अखेर आज सकाळी त्याचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली. 

हे पण वाचा - चोरी करून प्रेयसिला पाठवायचा सेल्फी

सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी शिंदे कुटुंबिय पट्टणकोडोलीत आले होते. काही दिवसांपूर्वी वडील ऊस तोडणी करीत होते. टळटळीत ऊन असल्यामुळे कुटुंबीयांनी विशालला थोड्या दूर अंतरावरील शेताच्या बांधावर झाडाच्या सावलीत ठेवले होते. विशाल रडू लागल्यामुळे त्याच्याकडे सर्वांचे लक्ष गेले. तेव्हा त्याच्या तोंडातून फेस येत होता. त्यामुळे शिंदे आणि त्यांच्या पत्नीने त्याला तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. येणाऱ्या फेसाचा संशय डॉक्‍टरांना आला. त्यांनी विशालने किटकनाशक प्यायल्याचा अंदाज करून त्यांना सीपीआरमध्ये जाण्याचा सल्ला दिला. यानंतर विशालवर सीपीआरमध्ये उपचार सुरू केले. 

हे पण वाचा - देवा किती खोटं.. पावती पाच ब्रासची उत्खनन 500

विशालची प्रकृती गंभीर होत होती. त्यामुळे डॉक्‍टरांनी त्याला अतिदक्षता विभागात ठेवून उपचार केले. दोन दिवसापूर्वी त्याची प्रकृती आणखी खालावली. आज अचानक प्रकृती खूपच खालावल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: small boy dead after food poisoning