Video : सारं गावच झालंय सर्परक्षक!

परशुराम कोकणे 
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

साप निघाला की...
बाळे परिसरात साप निघाला की, लगेच जवळच्या सर्परक्षकास कळविले जाते. बाळे गावातील नागरिकांना सापांबद्दलचे महत्त्व व त्याचे फायदे समजल्याने साप मारणे पूर्णपणे बंद झाले आहे. प्रबोधनामुळे गावात अनेक ठिकाणी साप निघाला, तर तेथील तरुण सुरक्षितपणे साप पकडून त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडून देतात किंवा सर्परक्षकास बोलावून सापाला त्यांच्या स्वाधीन केले जाते.

सोलापूर - सोलापूर शहरालगत असलेले बाळे हे जवळपास १५ ते २० हजार लोकसंख्येचे गाव. आजूबाजूला असलेली शेती, कॅनॉल, जुनी घरे यामुळे इथे रोजच सापांचे दर्शन होते. इतर गावांप्रमाणे इथेही पूर्वी साप दिसला की त्याला ठेचून, जाळून मारले जायचे... पण आता या गावात सापाला मारले जात नाही. इथल्या तरुणांनी केलेल्या प्रबोधनामुळे सारे गावच आता सर्परक्षक झाले आहे. जैवविविधतेमधील महत्त्वाचा घटक असलेल्या सापांच्या संवर्धनासाठी बाळे गावातील नागरिक तत्पर असल्याचे दिसतात. 

बाळे गावात १९९९ पासून नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे प्रमुख भरत छेडा यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय काकडे यांनी सापांच्या संवर्धनाला सुरवात केली. त्या काळात गावाच्या परिसरात दिवसातून १० ते १२ साप निघायचे. धनंजय एकटेच असल्यामुळे काही वेळेस सर्व ठिकाणी ते पोचू शकत नव्हते, त्यामुळे साप मारले जात होते. त्यामुळे त्यांनी साप पकडण्यासाठी एक टीम तयार करण्याचा निर्णय घेतला.

साप हा हात आणि पाय नसलेला सरपटणारा प्राणी आहे. साप डूक धरतो, नागाच्या डोक्‍यावर मणी असतात, सापांना केस असतात, साप दूध पितो, साप पुंगी वाजवल्यावर नाचतो, अशा अनेक गैरसमजुती लोकांमध्ये आहेत. मात्र आम्ही केलेल्या प्रबोधनामुळे बाळे परिसरात सापांना मारले जात नाही. 
- संतोष धाकपाडे, सदस्य, नेचर कॉन्झर्वेशन सर्कल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Snake Life Saving in Bale Village