बेळगावात बांधकाम परवान्यांचे सॉफ्टवेअर "लॉक' 

software designed for online building permits locked
software designed for online building permits locked

बेळगाव : ऑनलाईन बांधकाम परवान्यासाठी तयार करण्यात आलेले सॉफ्टवेअर "लॉक' झाले आहे. त्यामुळे शहरातील सुमारे 1500 आर्किटेक्‍ट व अभियंत्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण झाले नसून शहरातील बांधकाम परवान्यांची प्रक्रियाच ठप्प झाली आहे. लॉकडाउन झाल्यानंतर प्रारंभी काही दिवस ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत; पण एप्रिल महिन्यात ही प्रक्रियाच बंद झाली. महापालिकेच्या नगररचना विभागातील अभियंते व कर्मचारी कोरोना ड्युटीत व्यस्त झाल्यामुळे सॉफ्टवेअर लॉक होण्याआधी जे ऑनलाईन अर्ज दाखल झाले होते, त्यांची पडताळणी झालेली नाही. 

महापालिकेतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑनलाइन बांधकाम परवान्यांसाठी जी संगणकीय प्रणाली वापरण्यात आली आहे, ती प्रणालीच लॉक झाली आहे. यासाठी जे सॉफ्टवेअर वापरण्यात आले, त्या सॉफ्टवेअरचे बिल महापालिकेने थकविले आहे. बांधकाम परवान्यांसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची जबाबदारी महापालिकेच्या परवानाधारक आर्किटेक्‍ट व अभियंत्यांकडेच असते. या सर्वांना प्रत्येक आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात परवान्यांचे नूतनीकरण करावे लागते. ही नूतनीकरण प्रक्रिया ऑफलाईन असून त्यासाठी महापालिकेकडे अर्ज करावा लागतो. 25 मार्चपासून लॉकडाउन लागू झाल्यानंतर ही नूतनीकरण प्रक्रियाच ठप्प झाली. त्यामुळे आर्किटेक्‍ट व अभियंते यांना नव्याने अर्ज दाखल करता आलेले नाहीत. 

जोपर्यंत त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण होत नाही तोवर त्यांना बांधकाम परवान्यांचे ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार नाहीत. सध्या जे परवाने आहेत, त्यांना जून अखेरपर्यंत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी आर्किटेक्‍ट व अभियंते यांनी केली आहे; पण ती मागणी मान्य झालेली नाही. सॉफ्टवेअर अनलॉक होईपर्यंत व आर्किटेक्‍ट व अभियंत्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण होईपर्यंत बांधकाम परवान्यांनासाठी नव्याने अर्ज दाखल होणारच नाहीत.

मनपाच्या उत्पन्नावर परिणाम 

बांधकाम परवान्यांची प्रक्रिया ठप्प झाल्यामुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बांधकाम परवान्यांच्या माध्यमातून महापालिकेला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते. हे उत्पन्नच ठप्प झाल्यामुळे याचा विपरीत परिणाम महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर झाला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com