व्रत मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे...

Gaurav-Kaingade
Gaurav-Kaingade

कोल्हापूर - लाल मातीचे सुबक माठ असलेले एखादे भांडे, या मातीचीच एखादी मूर्ती पाहिली, हे कसं आणि कोणी बनवलं असेल? हाच विचार मनात येतो; पण आपणही थोड्याशा सरावानंतर हे बनवू शकतो, असा विश्‍वास गौरव काईंगडे या कलाकाराने दिला आहे आणि जे ही कला शिकू इच्छितात, त्यांना अगदी मोफत शिकवणे चालू केले आहे. कला एकाकडून दुसऱ्याकडे जात राहिली पाहिजे, तरच ती चिरंतन राहते. अशी गौरवची या उपक्रमामागची भावना आहे. 

मातीच्या वस्तू जे बनवतात त्यांना कुंभार म्हणतात आणि कुंभार कारागिरांनी ही कला जपलीही आहे; पण गौरव काईंगडे हा कुंभार नाही, मात्र त्याला कुंभारांच्या कलेचे आकर्षण निर्माण झाले. आणि या कलेतील टेराकोटा या तंत्रात तोही सरावाने शिकत शिकत तयार झाला. त्याने या कलेचा केवळ कृतीतून नव्हे, तर लिखित ज्ञानाचाही अभ्यास केला. 

या अभ्यासात त्याच्या लक्षात आले, की मातीची भांडी, मातीची खेळणी, गृहोपयोगी वापराच्या मातीच्या वस्तू याला भारतीय संस्कृतीत खूप महत्त्वाचे स्थान आहे. मातीच्या भांड्यातल्या जेवणाचे सत्व मोलाचे आहे.

मातीची भांडी व मानवी आरोग्याचा निकटचा संबंध आहे. त्यामुळे त्याने चाकावर मातीची भांडी बनविण्यास सुरवात केली. सुरवातीला मातीचा गोळा, चाकाचा वेग आणि मातीच्या गोळ्याला आकार देणारा हात याचा सूर जमेना. भांड्याला वाकडा तिकडा आकार येऊ लागला; पण हळूहळू मातीच्या 
गोळ्यालाही गौरवच्या हातातील माया जाणवू लागली व त्याच्या हातातील मातीच्या गोळ्यातून एक एक भांडे, मूर्ती आकार घेऊ लागली. एवढ्यावरच गौरव थांबला नाही. त्याने मातीच्या या भांड्यांना, मूर्तींना कलात्मक मॉडर्न रूप देण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्याने छोटी-छोटी मडकी, छोट्या आकारतला हत्ती, घोडा, खेळणी अशा वस्तू तयार केल्या. विशिष्ट तापमानावर भाजून त्या पक्‍क्‍या केल्या. कोणताही रंग न लावताही त्या वस्तू देखण्या झाल्या आणि अनेकांच्या दिवाणखान्यात दिमाखाने जाऊन बसल्या. आज अनेक घरांत केवळ टेराकोटा वस्तू व मूर्तींनी घरे सजवली आहेत. मोठ्या हॉटेल्समध्येही सजावटीसाठी त्याचाच प्राधान्याने वापर आहे. 

या वस्तू करण्याची एक कला आहे. सरावाने ते कोणीही आत्मसात करू शकतो. त्यामुळे गौरवने ही कला इतरांना शिकविण्याचे व्रत घेतले आहे. हातकणंगले तालुक्‍यातील वाठार तर्फ वडगाव येथे तो राहतो. जे इच्छुक आहेत, त्यांना मोफत मार्गदर्शन करतो व कला संस्कृतीचे त्याच्या परीने जतन करतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com