शंभरावे नाट्य संमेलन सोलापुरात घ्यावे 

रजनीश जोशी 
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

- शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल

- नाट्यसंमेलनाध्यक्ष होण्याचा मान मिळणे हा सोलापूरचाच गौरव

- रंगकर्मींचा आनंद द्विगुणित

सोलापूर : शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सोलापूरच्या डॉ. जब्बार पटेल यांच्या निवड निश्‍चित झाल्यानंतर हे संमेलन सोलापुरात घेण्यात यावे, अशी मागणी नाट्य परिषदेच्या महानगर शाखेचे अध्यक्ष अजय दासरी यांनी केली आहे. त्याला सोलापुरातील बहुतेक सर्व रंगकर्मींना जोरदार पाठींबा दिला आहे. 

हेही वाचा : मोतिराम वाघ... पर्यावरण रक्षणासाठी झटणारा अवलिया

नाट्य परिषदेच्या मुख्य शाखेचे अध्यक्ष, माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनीही श्री. दासरी यांच्या मागणीला पाठिंबा दिला असून संमेलन सोलापुरात झाल्यास सर्व प्रकारचे सहकार्य करू, अशी भूमिका घेतली आहे.डॉ. पटेल यांना शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाध्यक्ष होण्याचा मान मिळणे हा सोलापूरचाच गौरव आहे, अशी भावना रंगकर्मींनी व्यक्त केली. 

हेही वाचा : चोरी करुन कपाटाला पुन्हा लावले कुलूप

नाट्य परिषदेच्या उपनगरी शाखेच्या सदस्य व ज्येष्ठ कलावंत शोभा बोल्ली यांनी संमेलन सोलापुरात झाल्यास इथल्या रंगकर्मींचा आनंद द्विगुणित होईल, असे सांगितले. समाराधना संस्थेचे संस्थापक सुनील गुरव म्हणाले,सोलापुरात शंभरावे नाट्य संमेलन होण्यासारखा दुसरा आनंद नाही. हा दुग्धशर्करा योग आहे. 
ज्येष्ठ नेपथ्यकार, कलावंत गुरू वठारे यांनी शंभरावे नाट्य संमेलन सोलापुरात व्हावे, यासाठी लागेल ती मदत करू असे सांगितले. डॉ. पटेल यांची अध्यक्षपदी निवड होणे हा आपल्या आयुष्यातील भाग्याचा क्षण असल्याचे ते म्हणाले. 

नाट्य परिषद शाखांना खरबस यांचे आवाहन 
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या कार्यकारिणीचे सदस्य आणि ज्येष्ठ नाटककार आनंद खरबस यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व नाट्यपरिषद शाखांनी डॉ. जब्बार पटेल यांच्या नावाला पाठिंबा देणारे पत्र मध्यवर्ती शाखेकडे तातडीने पाठवावे, असे आवाहन केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur artist demand 100 th natysamlen