चोरी करून कपाटाला पुन्हा लावले कुलुप! 

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

- प्राध्यापकाचे घर फोडले 
- तेरा तोळे सोन्याचे दागिने लंपास 
- विजापूर रस्त्यावरील अमर नगरातील घटना 

सोलापूर : प्राध्यापकाचे घर फोडून चार लाख पंचवीस हजार रुपयांचे जवळपास तेरा तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेले. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास विजापूर रोड परिसरातील अमर नगरात घडली. चोरी केल्यानंतर चोरट्याने कपाटाला पुन्हा कुलुप लावल्याचे समोर आले आहे. 

हेही वाचा : सावधान... घरात घुसताहेत चेन स्नॅचर

कुटूंबासह गेले होते नातेवाईकांच्या घरी 
श्रीकांत रमाकांत दावणकर (वय 32) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दावणकर हे व्हीव्हीपी कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. श्रीकांत दावणकर आणि त्यांचे कुटूंबीय हे मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घराला कुलूप लावून नातेवाईकांकडे गेले होते. त्यांनी नातेवाईकांकडेच मुक्काम केला. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ते घरी परत आले. त्यांना घरांमध्ये चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्याने कुलुप उघडून आतमध्ये प्रवेश करून घरातील कपाटांमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने तसेच रोख रकमेची चोरी केली. यामध्ये सोन्याचे गंठण, कानातील टॉप्स, मंगळसूत्र तसेच इतर सोन्याचे दागिने आणि चार हजारांची रोकड आहे.

हेही वाचा : ...अन्‌ कोपरगावच्या आजोबाला परत मिळाली बॅग!

सापडली नाही दुसऱ्या कपाटाची चावी 
या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. श्‍वान पथकही आले होते. श्रीकांत दावणकर यांच्या घरात चोरट्याला एका कपाटाची चावी सापडली. त्या चावीने कपाट उघडून आतील दागिने काढून घेतले. त्यानंतर त्या कपाटाला पुन्हा चावी लावली आणि चावी खाली टाकून दिली. घरात आणखी एक कपाट होते, त्या कपाटाची चावी चोरट्याला सापडली नाही. त्या कपाटात जवळपास साडेआठ तोळे सोन्याचे दागिने होते. पोलिस उपनिरीक्षक सचिन बनकर तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft at the professor's home