सोलापूर - गणेशोत्सव मंडळांना सवलतीत वीज 

सोलापूर - गणेशोत्सव मंडळांना सवलतीत वीज 

सोलापूर - सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सवलतीच्या दरात म्हणजेच चार रुपये 38 पैसे प्रतियुनिट या दराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी देण्यात येणार आहे. मंडळांनी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 

सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट तीन रुपये 20 पैसे अधिक एक रुपया 18 पैसे वहन (व्हिलींग) आकार तसेच इंधन अधिभार असे वीजदर आहेत. व्हिलींग चार्जेससह हा दर घरगुती वीजदरापेक्षा फक्त 13 पैशांनी अधिक आहे तर वाणिज्यिक दरापेक्षा दोन रुपये 90 पैसे प्रतियुनिटने कमी आहे. धार्मिक उत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा. यासाठी तात्पुरत्या वीजजोडणीचा वीजदर कमी ठेवला आहे

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यासाठी लागणारी वीजयंत्रणा ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घ्यावी. अर्थिंगचीही खबरदारी घ्यावी. वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्स हे वीजभारासाठी सक्षम नसल्यास शार्टसर्किटचा धोका निर्माण होतो. याशिवाय सध्या पावसाळी दिवस असल्याने तसेच मंडपासाठी टिनपत्र्यांचा वापर होत असल्याने वायर्स लूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेले पण टेपने जोडलेले असल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासह अपघाताची शक्‍यता असते. 

तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी 24 तास सुरू असणारे टोल फ्री क्रमांक 1912, 18001023435 किंवा 18002333435 यावर संपर्क साधावा. याशिवाय संबंधित क्षेत्रातील महावितरणचे अभियंता यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत. 

गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्‍यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमूळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजसुरक्षेबाबत उपाययोजनांमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड न करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com