सोलापूरला सोमवारपासून तीन दिवसाआड पाणी 

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 9 जून 2018

शहराला पाणीपुरवठा होणारा औज आणि चिंचपूर हे बंधारे आज (शनिवारी) दुपारी ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे शहराला सोमवारपासून (ता.11) तीन दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. 

सोलापूर - शहराला पाणीपुरवठा होणारा औज आणि चिंचपूर हे बंधारे आज (शनिवारी) दुपारी ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे शहराला सोमवारपासून (ता.11) तीन दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. 

महिन्यापूर्वी औज बंधाऱ्यातील पाण्याची पातळी शून्य झाली होती. तत्पूर्वीच उजनी धरणातून पाणी सोडण्यासाठी प्रशासनाने पत्रव्यवहार सुरु केला होता. मात्र पाणीपट्टी थकबाकीच्या वादात पाणी सोडायचे की नाही याबाबत संदिग्धता होती. पालकमंत्री विजय देशमुख यांनीही जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यासोबत चर्चा करून पाणी सोडण्यास सांगितले होते. महापौर शोभा बनशेट्टी व आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे यांनीही जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला. 

शासनस्तरावर झालेल्या चर्चेनंतर 29 मे रोजी सायंकाळी 600 क्‍युसेकने उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले. पाण्याचा विसर्ग पाहता हे पाणी औजमध्ये पोचण्यास किमान आठ दिवस लागतील, असे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर पाण्याचा विसर्ग तीन हजार क्‍युसेसपर्यंत मर्यादित ठेवण्यात आला. त्यामुळे 15 किंवा 16 जूनपर्यंत पाणी पोचेल, असे प्रशासनाने जाहीर केले, शिवाय चार दिवसाआडऐवजी पाच आणि गरज पडल्यास सहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले. 

अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे वेळापत्रक बिघडले असतानाच वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले. सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्याने पाणीपुरवठ्याचे नियोजन बदलण्यात आले. पाणी पंढरपूरला पोचल्यानंतरही औजमध्ये पोचण्यास आठ ते दहा दिवस लागण्याची शक्‍यता वर्तविली जात असताना गेल्या तीन-चार दिवसात शहर व जिल्हा परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने दिलासा दिला आणि नियोजित वेळेच्या अगोदर औज आणि चिंचपूर बंधाऱ्यात पाणी पोचले आहे. 

औज आणि चिंचपूर बंधाऱ्यात पाण्याचा पुरेसा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून (ता.11) शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे, असे सोलापूर महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंता जी. एन. दुलंगे यांनी सांगितले आहे.

Web Title: Solapur gets day after tomorrow water from Monday