सोलापूर लोकसभेची जागा होतेय 'हॅाट सीट'

विजयकुमार सोनवणे
रविवार, 8 जुलै 2018

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुकांची वाढती गर्दी पाहता ही जागा 'हॅाट सीट' होण्याची शक्यता आहे.  

ःसोलापूर- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुकांची वाढती गर्दी पाहता ही जागा 'हॅाट सीट' होण्याची शक्यता आहे.  

स्वातंत्र्यपूर्व काळात तीन दिवस स्वातंत्र्य उपभोगण्याचे भाग्य सोलापूरकरांना मिळाले. या काळात जहाल क्रांतीची पार्श्वभूमी असल्याने सोलापूरचा उल्लेख 'शोला' पूर असा केला जायचा. लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी तसेच काही दिवसांच्या अंतराने समोर येणारी नवनवीन नावे यामुळे सोलापूर पुन्हा एकदा उमेदवारीच्या दृष्टीने 'शोला' पूर होण्याची चिन्हे असून, लोकसभेची जागा खर्या अर्थाने 'हॅाट सीट' बनण्याची चिन्हे आहेत.

भाजपचे लिंगराज वल्याळ, प्रतापसिंह मोहिते-पाटील आणि सुभाष देशमुख यांचा कालावधी वगळता या मतदारसंघात सातत्याने कांग्रेसला संधी मिळाली. कांग्रेसचे सूरजरतन दमाणी, गंगाधरपंत कुचन, धर्माण्णा सादूल व सुशीलकुमार शिंदे यांचे या मतदारसंघावर वर्चस्व राहिले. हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी असताना शिंदे विजयी झाले, मतदारसंघ राखीव झाल्यावर मात्र त्यांचा पराभव झाला. सध्या भाजपचे अॅड. शरद बनसोडे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. सातत्याने बदलाचा अनुभव असलेल्या या मतदारसंघासाठी राज्यभरातील नावे आता चर्चेत येऊ लागली आहेत, त्यामुळे हा मतदारसंघ पुन्हा चर्चेने ढवळून निघाला आहे. 

कांग्रेसचे दमाणीवगळता उर्वरीत सर्व खासदार हे सोलापूर शहर किंवा जिल्ह्याचे भूमीपूत्र आहेत. दमाणी हे मूळचे बिकानेर (राजस्थान) येथील होते. अखिल भारतीय
कांग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम करताना त्यांना सोलापूरच्या खासदारकीची संधी मिळाली. सोलापूरचे भूमीपुत्र नसलेले ते एकमेव खासदार होते. आता पुन्हा
सोलापूरबाहेरील उमेदवार सोलापुरात उभारण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. त्याची सुरवात भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे (पिंपरी-चिंचवड) यांच्यापासून झाली.

भाजपच्याच माजी जिल्हाप्रमुखांनी पंढरपुरात झालेल्या कार्यक्रमामध्ये साबळे यांना सोलापुरातून उभारण्याची विनंती केली आणि तेथून उमेदवारीच्या चर्चेला सुरवात झाली. सध्या या मतदारसंघातून भारिपचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (अकोला) यांचेही नाव पुढे आले आहे. मोहोळचे  आमदार रमेश कदम यांचे नाव एमआयएमतर्फे पुढे आले आहे. केंद्रीय समाजकल्याणंत्री रामदास आठवले यांचे कट्टर समर्थक राजाभाऊ सरवदे हेही इच्छुक आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे दिवस जसजसे जवळ येतील, तसतसे रंगतदार चित्र सोलापूरकरांना पहावयास मिळणार आहे. 

... तर वाढणार जोरदार चुरस
चर्चेतल्या नावापैकी सर्वचजण रिंगणात उतरले तर सोलापूरच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागणार आहे. पक्षाच्या नावावरून निवडणूक लढविण्याएेवजी भूमिपूत्र विरुद्ध उपरा हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरेल. मतांची मोठ्या प्रमाणात विभागणी होईल. भरवश्याची एक गठ्ठा मते विभागल्याने सर्वांचेच अंदाज चुकतील आणि दिग्गज उमेदवारांनाही 'जोर का झटका धीरेसे लगे'चा अनुभव येईल.

Web Title: Solapur Lok Sabha seat gets 'hot seat'