वसतिगृहासाठी जागा देता का?

प्रमोद बोडके
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

सोलापूर - मराठा समाजाच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरी सकारात्मक भूमिका घेत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्याच सरकारमधील दुग्धविकास विभाग, पर्यटन विकास महामंडळ आणि व्यवसाय शिक्षण विभाग मात्र उदासीन आहेत. सोलापूरच्या मराठा वसतिगृहासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठविलेला प्रस्ताव या तिन्ही विभागांनी धुडकावला आहे. वसतिगृहाला कोणी जागा देता का जागा, अशीच स्थिती निर्माण झाली आहे.

सध्या तात्पुरत्या स्वरूपात वसतिगृह उभारण्यात येणार आहेत. या वसतिगृहांसाठी जागेची मागणी करण्यात आली होती. महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या जयभवानी हायस्कूलबाबत प्रशासनाला अद्याप उत्तर आलेले नाही; परंतु या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या स्वच्छतागृहांची व्यवस्था नसल्याने वसतिगृह सुरू करण्यासाठी प्रशासनाला कष्ट घ्यावे लागणार आहेत. जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण असलेल्या शिवछत्रपती रंगभवन सभागृह परिसरात वसतिगृह सुरू करण्याचा पर्याय आता प्रशासनासमोर आहे. वसतिगृह मागणीसाठी 27 विद्यार्थ्यांचे अर्ज आहेत.

दुग्धविकासचा पीपीपी
दुग्धविकास विभागाच्या शासकीय दूध योजनेची सातरस्ता येथे इमारत व मोकळी जागा आहे. या जागेवर पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिफेशन (पीपीपी) तत्त्वावर ही योजना सुरू करणार असल्याने या जागेची आवश्‍यकता आहे. त्यामुळे वसतिगृहाला ही जागा नाकारण्यात आली आहे.

एमटीडीसीची तिसरी बॅच
महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने संभाजी तलाव परिसरात केटरिंग व हॉटेल मॅनेजमेंटचे इन्स्टिट्यूट चालविले जात आहे. सध्या या ठिकाणी दोन बॅच सुरू आहेत. तिसरी बॅच लवकरच सुरू होणार असल्याने या विभागानेही नकार दिला आहे.

व्यवसाय शिक्षणचे शिफ्टिंग
व्यवसाय शिक्षण विभागाच्या वतीने डफरीन चौक परिसरात मुलींसाठी आयटीआय विभाग चालविण्यात येतो. त्या ठिकाणी मराठा समाजातील मुलींच्या वसतिगृहाचे नियोजन होते. ही जागा स्थलांतरासाठी लागणार असल्याचे कारण या विभागाने दिले आहे.

जय भवानी हायस्कूलची जागा गैरसोयीची आहे. शहरातील ज्या पसिरात महाविद्यालये, शिक्षणसंस्था आहेत त्याच ठिकाणी वसतिगृह सुरू झाले, तर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळेल. विद्यार्थ्यांना वसतिगृहाची आवश्‍यकता आहे; परंतु विश्‍वासार्हता नसल्याने विद्यार्थी पुढे येत नाहीत.
- माउली पवार, समन्वयक, सकल मराठा समाज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur maratha hostel place