उड्डाणपुलासंदर्भातील ठराव परस्पर बदलला 

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

मंजूर उपसूचनेचा उल्लेखही नाही ; वेगळेच प्रकरण शासनाकडे 

सोलापूर : उड्डाणपूल उभारण्याबाबत महापालिकेच्या सभेत झालेला ठराव परस्पर बदलण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. शिवसेनेने मांडलेली उपसूचना बहुमताने मंजूर झाली असतानाही त्याऐवजी वेगळाच ठराव शासनाकडे पाठविण्याची तयारी महापापालिका प्रशासनाने केली आहे. 

उड्डाणपूलासंदर्भात 16 सप्टेंबर रोजी सभा झाली. प्रशासनाने पाठविलेल्या प्रस्तावानुसार कार्यवाही करावी, अशी सूचना सत्ताधाऱ्यांनी मांडली होती. तर त्यात शिवसेनेने फेरबदल सुचविले. भय्या चौकापासून उड्डाणपूल करावा असे उपसूचनेत म्हटले होते. गाळ्याच्या विषयांवरून पालकमंत्री विजय देशमुख यांच्या गटातील नगरसेवकांनी सभात्याग केल्याने या विषयावर चर्चा झाली नाही. उपसूचना मांडल्यानंतर हा विषय बहुमताने मंजूर झाल्याची घोषणा महापौर शोभा बनशेट्टी यांनी केली होती.

उड्डाणपूलासंदर्भात शिवसेनेची उपसूचना बहुमताने मंजूर झाल्याचे सर्वच माध्यमातून प्रसिद्ध झाले होते. या पार्श्‍वभूमीवर शासनाकडे पाठविण्यात येत असलेला प्रस्ताव पाहिला असता तो धक्कादायक आहे. प्रत्येक घटनेला केराची टोपली दाखविण्याची परंपरा असलेल्या नगरसचिव कार्यालयातील अधिकाऱ्यांनी चक्क सभागृहातला ठरावच बदलला आहे. महापौरांनी उपसूचना मंजूर झाल्याचे सभागृह, पत्रकार आणि नागरीकांच्या साक्षीने घोषित केले असतानाही सूचना मंजूर झाल्याचा उल्लेख ठरावात करण्यात आला आहे. 

महापालिकेच्या सभेत जे ठराव होतात त्याच पद्धतीने ते शासनाकडे पाठविले जातात का हा प्रश्‍न या घटनेमुळे उपस्थित होत आहे. सभागृहात झालेले ठराव परस्पर बदलले जात असतील तर लाखो रुपये खर्चून सभागृह चालविण्याची गरजच काय? असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. नगरसचिवांच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी आहेत. त्यांना पदावरून काढून टाकण्याचा सर्वपक्षीय प्रस्ताव सभेसमोर आला होता. मात्र तो ऐनवेळी दप्तरी दाखल करण्यात आला. त्यामागे असे प्रकार कारणीभूत आहेत का, असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. सातत्याने कारवाईच्या घोषणा करणारे आयुक्त आता काय निर्णय घेतात हे पाहणेही औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

नगरसचिवांनी खुलासा का केला नाही? 
महापालिकेच्या सभेत सूचना बहुमताने मंजूर झाली असा उल्लेख आहे. प्रत्यक्षात उपसूचना मंजूर झाली होती,तशा बातम्या सर्वच माध्यमातून प्रसिद्ध झाल्या होत्या. सभागृहातील ठरावाबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्या चुकीच्या असतील तर त्याबाबत नगरसचिवांनी खुलासा देणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी खुलासा केला नाही. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या महापालिकेचा कारभार कोणत्या दिशेने चालला आहे, त्याचा अनुभव येत आहे.

Web Title: solapur marathi news flyover proposal changed abruptly