सोलापूर, मुर्शिया शहराच्या करारावर शिक्कामोर्तब 

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 5 जुलै 2018

सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी व तपन डंके यांनी, तर मुर्शिया शहराचे महापौर डॉ. जोस बॉलेस्टा, आय. यु. सी. इंडिया, दिल्ली येथील टीम लिडर डॉ. पानथौटीस कार्मोनस यांनी संवाद साधला. केंद्र शासनाच्या शाश्‍वत नागरी विकास योजनेसाठी देशातील 12 शहरांत सोलापूरची निवड झाली.

सोलापूर : शाश्‍वत शहरी विकास योजनेंतर्गत सोलापूर महापालिका आणि स्पेनमधील मुर्शिया या शहरादरम्यान 24 मे रोजी सामंजस्य करार सोलापुरात झाला होता. त्यावर आज (बुधवारी) मुर्शिया येथील सिटी हॉलमध्ये मुर्शियाचे महापौर व अधिकाऱ्यांनी करारावर स्वाक्षरी केली व करारावर शिक्‍कामोर्तब केले. या करारामुळे शाश्‍वत विकासाच्या योजनांना गती मिळणार आहे. 

सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी व तपन डंके यांनी, तर मुर्शिया शहराचे महापौर डॉ. जोस बॉलेस्टा, आय. यु. सी. इंडिया, दिल्ली येथील टीम लिडर डॉ. पानथौटीस कार्मोनस यांनी संवाद साधला. केंद्र शासनाच्या शाश्‍वत नागरी विकास योजनेसाठी देशातील 12 शहरांत सोलापूरची निवड झाली. या योजनेतून मूलभूत सुविधा सुकर करण्याबाबत वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाचे आदानप्रदान केले जाणार आहे. यामध्ये प्रदूषण, पाणीपुरवठा, उद्योगवाढीसाठी तंत्रज्ञान यातून आदर्श शहरांची निर्मिती करणे हा हेतू असणार आहे. याबाबत कॉर्पोरेशनच्या माध्यमातून या सुविधा पुरविण्यासाठी सल्लागार पुरविण्यात येतील. युरोपियन युनियन व भारतीय शहरात सिटी टू सिटी सहयोग असेल.

शाश्‍वत शहरीकरण प्राधान्यक्रमावर स्थानिक कृती योजना विकसित करणे, तंत्रज्ञान, ज्ञान हस्तांतरण करणे, ग्रीन सीटी डेव्हलप करणे तसेच प्राधान्यक्रमांना वित्त पुरवठ्यासाठी खासगी व व्यवसाय क्षेत्रांचा सहभाग वाढविण्यावर भर राहील. या करारमुळे स्मार्ट सिटीचा विकास, शहरवासीयांना उच्च दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध करणे, शहर विकासाकरिता एकमेकाच्या शैक्षणिक, तंत्रज्ञानाचे आदान प्रदान करणे शक्‍य होणार आहे. या करारामुळे दोन्ही शहरांचा शाश्‍वत विकास होईल, अशी आशा महापौर सौ. बनशेट्टी यांनी व्यक्त केली.

Web Title: solapur municipal corporation agreement with murshia city