करमणूक व्यवसायासाठी सोलापूर महापालिका परवाना शुल्क आकारणार 

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 1 डिसेंबर 2018

शासनाच्या सूचनेनुसार शहरातील प्रस्तावित व्यवसायांची यादी महसूल विभागाकडून मागविली आहे. त्यास महापालिका सभेची मंजुरी मिळाली की कार्यवाही केली जाईल. शासनाचाच आदेश असल्याने पुन्हा शासन मंजुरीसाठी पाठविण्याची गरज नाही. 
- ए. के. आराध्ये, अधीक्षक, परवाना विभाग, सोलापूर महापालिका

सोलापूर : राज्य शासनाचा करमणूक कर बंद झाल्याने असे व्यवसाय करणाऱ्यांना आता महापालिकेकडून परवाना घ्यावा लागणार आहे. तात्पुरत्या कार्यक्रमासाठीही निश्‍चित शुल्क द्यावे लागणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. 

जीएसटी लागू झाल्यापासून चित्रपटगृह, व्हिडिओ सेंटर, केबल चालक, केबल वितरक, ऑर्केस्ट्रा बार आणि व्हिडिओ गेम्स यासाठी राज्य शासनाकडून वसूल केला जाणारा कर बंद झाला आहे. महापालिकांचे उत्पन्न वाढावे यासाठी शासनाने करमणूक व्यवसायाला कर लावण्याची सूचना महापालिकांना केली आहे. त्यानुसार महापालिकेने प्रस्ताव तयार केला आहे. प्रस्तावित परवाना शुल्कामध्ये दरवर्षी 10 टक्के वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. डुप्लिकेट परवाना घेण्यासाठी 110 रुपये शुल्क भरावे लागेल. मुख्य व्यवसायाव्यतिरिक्त इतरांसाठी संकीर्ण सदरी शुल्क आकारण्यात येईल. हा परवाना एक वर्षासाठी दिला जाणार आहे. नूतनीकरणासाठी तीन महिने अगोदर अर्ज करावा लागेल. मुदतीनंतर विहीत कालावधीत नूतनीकरण न केल्यास परवाना रद्द केला जाणार आहे. त्यानंतर सर्व कागदपत्रांसह नवीन परवान्यासाठी अर्ज करणे बंधनकारक असणार आहे. महापालिकेने परवाना रद्द केला तर त्या विरोधात न्यायालयात दाद मागता येणार नाही, अशा अटी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. 

एक वर्षांसाठी प्रस्तावित परवाना शुल्क 
व्यवसाय शुल्क रुपयांत 
चित्रपटगृहे 1500 
व्हिडिओ सेंटर 1000 
व्हिडिओ गेम्स 1500 
केबल मुख्य चालक 5000 
केबल वितरक 1000 
ऑर्केस्ट्रा बार 1500 
संकीर्ण 1000 

शासनाच्या सूचनेनुसार शहरातील प्रस्तावित व्यवसायांची यादी महसूल विभागाकडून मागविली आहे. त्यास महापालिका सभेची मंजुरी मिळाली की कार्यवाही केली जाईल. शासनाचाच आदेश असल्याने पुन्हा शासन मंजुरीसाठी पाठविण्याची गरज नाही. 
- ए. के. आराध्ये, अधीक्षक, परवाना विभाग, सोलापूर महापालिका

Web Title: solapur municipal corporation entertainment tax