महापालिकेची सभा पहिल्यांदा वेळेवर, पण झाली तहकूब

विजयकुमार सोनवणे
रविवार, 1 एप्रिल 2018

महापौर निघून गेल्यानंतर पक्षनेते संजय कोळी भाजपच्या नगरसेवकांसह सभागृहात आले. पण सभा तहकूब झाल्याचे पाहून आल्या पावली परत गेले. त्यावेळी कांग्रेसच्या
श्रीदेवी फुलारे यांनी सत्ताधाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्याचवेळी कांग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, माकपच्या कामिनी आडम, एमआयएमचे रियाज खरादी, 
 नगरसेविका अनुराधा काटकर सभागृहात आल्या.

सोलापूर : महापालिकेच्या इतिहासात काल पहिल्यांदा सर्वसाधारण सभा वेळेवर सुरू झाली, पण केवळ तीनच नगरसेवक उपस्थित असल्याने कोरमअभावी सभा तहकूब करण्यात आली. 

या  सभेत शहरातील उड्डाणपूल आणि ड्रेनेजचे विषय होते. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी अनेक नगरसेवकांनी तयारी केली होती. एरवी सकाळी साडेअकरा वाजता होणारी सभा दुपारी बारा किंवा कधी-कधी एक वाजता सुरु होते. हा सार्वत्रिक अनुभव असल्याने अनेक नगरसेवक महापालिकेत येऊनही इतरत्र फिरत होते, कुणी कार्यालयात बसून होते. दरम्यान, महापौर येण्याअगोदर आयुक्त  अविनाश ढाकणे सभागृहात आले. त्यानंतर काही वेळांनी महापौर  शोभा बनशेट्टी सभागृहात आल्या. त्यावेळी सभागृहात फक्त बसपचे आनंद चंदनशिवे, कांग्रेसच्या श्रीदेवी फुलारे आणि एमआयएमच्या शाहजीदाबानो शेख हे तीनच सदस्य सभागृहात होते. वंदे मातरम झाल्यावर श्री. चंदनशिवे यांनी लक्षवेधी मांडण्याचा प्रयत्न केला, पण कोरम नसल्याचे सांगत महापौरांनी सभा तहकूब केली व  त्या निघून गेल्या. 

महापौर निघून गेल्यानंतर पक्षनेते संजय कोळी भाजपच्या नगरसेवकांसह सभागृहात आले. पण सभा तहकूब झाल्याचे पाहून आल्या पावली परत गेले. त्यावेळी कांग्रेसच्या
श्रीदेवी फुलारे यांनी सत्ताधाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्याचवेळी कांग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, माकपच्या कामिनी आडम, एमआयएमचे रियाज खरादी, 
 नगरसेविका अनुराधा काटकर सभागृहात आल्या. वारंवार सभा तहकूब होत असल्याने शहराचा विकास थांबल्याचा आरोप त्यांनी केला. असाच प्रकार होत राहीला तर 
शहर विकासाचे निर्णय कधी होणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेचे नगरसेवक विरोधी पक्षनेता कार्यालयात बसून होते, मात्र एकजणही सभागृहात आले नाहीत. सभा तहकूब झाल्याचे कळाल्यावर त्यांनी आयुक्त कार्यालय गाठले.

... म्हणून सभा केली तहकूब
ड्रेनेजच्या प्रस्तावामध्ये प्रभाग 14 चा काही परिसर आहे. त्या ठिकाणी पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे हा विषय मंजूर केला असता
तर सत्ताधार्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला असता. त्यामुळे सभा तहकूब करण्यात आल्याची चर्चा आहे. आचारसंहितेच्या कारणावरून एमआयएमचे संस्थापक अध्यक्ष अॅड. असोसीद्दीन अोवीसी यांना मानपत्र देण्याचा प्रस्ताव नाकारणार्या नगरसचिवांनी, ड्रेनेजचा विषय घेता येणार नाही असे महापौरांना का सांगितले नाही, असा प्रश्न रिजाय खरादी यांनी उपस्थित केला आहे. तर, मार्च 2017 च्या अजेंड्यावर प्रस्ताव घेण्याचा उल्लेख खरादी यांच्या पत्रावर असल्याचे सांगत, शिवसेनेच्या एका नगरसेवकाने आपल्या पाहुण्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. चुकीच्या तारखेचा प्रस्ताव आला तर, नगरसचिवांनी तो स्वीकारलाच कसा, प्रस्ताव तपासला नाही का, या प्रश्नाचे उत्तर मात्र त्यांस देता आले नाही.

Web Title: Solapur Municipal Corporation GB