सोलापूर महापालिकेत सभाशास्त्राचा कचरा

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 5 मे 2018

एकाद्या विषयावर रुलिंग दिल्यावर त्यावर पुन्हा चर्चा होणे अयोग्य आहे, महापौरांच्या निर्णयाला काहीच अर्थ रहात नाही. असे प्रकार होत असतील तर ते थांबविण्याची जबाबदारी नगरसचिवांची आहे. तेही गप्प बसत असतील तर, नगरसचिव म्हणून काम करण्यास ते पात्र नाहीत असेच म्हणावे लागेल.
- प्रा. डॅा. पुरणचंद्र पुंजाल, माजी महापौर

सोलापूर : एखाद्या विषयावर महापौरांनी रुलिंग (निर्णय) दिल्यावर त्यावर पुन्हा भाष्य करता येत नाही. मात्र सोलापूर महापालिकेत रुलिंग दिलेल्या विषयावर पुन्हा दीड ते दोन तास चर्चा करून नवीन पायंडा पाडण्यात आला. हा प्रकार म्हणजे सत्ताधाऱ्यांनी सभाशास्त्राचा कचराच केल्यासारखे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे. 

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर निवडून आलेले जवळपास 80 टक्के नगरसेवक नवीन आहेत. त्यांना सभाशास्त्राची माहिती नाही. त्यामुळे रुलिंग दिलेल्या विषयावर पुन्हा चर्चा होऊ शकत नाही, हे अनेकांना माहिती नाही. त्यामुळे सभेत चाललेले कामकाज फक्त बघत बसणे एवढेच काम बहुतांश नगरसेवकांकडून होते. ज्यांना या नियमांची माहिती आहे, ते ज्येष्ठ नगरसेवक बहुतांश वेळेस सभेस येत नाहीत, आले तरी लगेच निघून जातात. त्यामुळे सभाशास्त्राचे गांभीर्यच निघून गेले आहे. 

काल झालेल्या महापालिकेच्या सभेतत घंटागाडी कर्मचार्यांच्या नियुक्तीचा विषय होता. त्यावर अर्धा तास चर्चा झाली. आरोप-प्रत्यारोप झाले. त्यानंतर  सभागृह नेत्यांनी मांडलेली सूचना बहुमताने मंजूर झाल्याचा रुलिंग महापौरांनी दिला. मात्र त्यानंतर काही नगरसेवकांनी घंटागाडीसंदर्भातच पुन्हा चर्चा सुरु केली आणि ती तब्बल दीड ते दोन तास चर्चा करण्यात आली. नगरसेवकांची मागणी म्हणून पुन्हा चर्चा केली, असे स्पष्टीकरण महापौरांकडून येऊ  शकते. मात्र रुलिंग दिलेल्या विषयावर मनोगत व्यक्त करण्याची मागणी करणार्या विरोधी पक्षातील नगरसेवकांना मात्र संधी नाकारण्यात येते. 

एकूणच आपल्याला पाहिजे तेंव्हा नियम पाळायचे आणि पाहिजे तेंव्हा नियम पायदळी तुडवायचे असे प्रकार महापालिकेत होत आहेत. असे प्रकार होऊ  नयेत याची दक्षता घेण्याची जबाबदारी विरोधी पक्षातील नगरसेवकांची आहे. मात्र केवळ आक्षेप नोंदविण्याशिवाय ते काही करत नाहीत, त्याचा फायदा घेत सत्ताधारी पदाधिकारी त्यांच्या सोईने सभागृहाचे कामकाज चालवित आहेत आणि विरोधक फक्त बघत बसत आहेत. 

एकाद्या विषयावर रुलिंग दिल्यावर त्यावर पुन्हा चर्चा होणे अयोग्य आहे, महापौरांच्या निर्णयाला काहीच अर्थ रहात नाही. असे प्रकार होत असतील तर ते थांबविण्याची जबाबदारी नगरसचिवांची आहे. तेही गप्प बसत असतील तर, नगरसचिव म्हणून काम करण्यास ते पात्र नाहीत असेच म्हणावे लागेल.
- प्रा. डॅा. पुरणचंद्र पुंजाल, माजी महापौर

Web Title: Solapur Municipal Corporation mayor decision