महापालिका 'स्थायी'चे अधिनियम रद्द करा

विजयकुमार सोनवणे 
बुधवार, 2 मे 2018

आम्ही दिलेला प्रस्ताव फेटाळला जाणार याची शंभर टक्के खात्री आहे. पण सभागृहाचे कामकाज प्रथेनुसार चालते कायद्यानुसार नाही याबाबत एकाही अभ्यासू नगरसेवकाला खंत वाटत नाही हे दुर्देव आहे. "एमआयएम' भारताचे कायदे पाळत नाही असा आक्षेप घेतला जातो. सोलापूर महापालिकेत कायद्याची खिल्ली उडवली जात असताना "देशभक्त' पक्षांचे नगरसेवक मूग गिळून गप्प बसतात, त्याचे काय? 
- रियाज खरादी, नगरसेवक, एमआयएम 

सोलापूर : महापालिकेचे नगरसचिव पी.पी. दंतकाळे यांच्यानुसार स्थायी समितीचा कारभार हा कायद्यानुसार नाही तर प्रथेनुसार चालतो. त्यामुळे समितीच्या कामकाजासाठी असलेले अधिनियम रद्द करण्याची शिफारस शासनाकडे करावी, असा प्रस्ताव एमआयएमच्या दोन नगरसेवकांनी महापालिका सभेकडे पाठविला आहे. अधिनियम रद्द करण्याचा प्रस्ताव आल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. 

महापालिकेतील स्थायी समिती सभापती निवडीची प्रक्रिया सध्या न्यायप्रविष्ठ आहे. या पार्श्‍वभूमीवर एप्रिलमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी न्यायप्रविष्ठ बाब निर्माण झाली तर सभा बोलावण्यासाठी काय करावे लागते ? महापौर देतील त्या तारखेस सभा बोलावण्याची तरतूद अधिनियमात आहे, तशी तरतूद स्थायी समितीबाबत आहे का? असा प्रश्‍न उपस्थित केला होता. 

त्यावेळी श्री. दंतकाळे यांनी, "सभापती बोलावतील त्या दिवशी सभा काढली जाते व ही गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. त्यानुसारच आताही सभापती सांगतील त्यादिवशी सभा काढण्याची प्रथा सुरु आहे, प्रथेनुसारच समितीचे कामकाज चालते' असे उत्तर दिले होते. श्री. दंतकाळे यांनी दिलेले उत्तर "इतिवृत्तात' नोंद करण्यात आली आहे. 

महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहात जबाबदार अधिकाऱ्याने दिलेले उत्तर पाहता, सोलापूर महापालिकेसाठी कायद्याची गरज नाही. त्याऐवजी प्रथापरंपरेनुसारच येथील कारभार चालावा, अशी स्थिती आहे. त्यामुळे किमान सोलापूर महापालिकेसाठीचे अधिनियम रद्द करावेत, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. एमआयएमचे रियाज खरादी व गाझी जहागिरदार यांनी हा प्रस्ताव दिला आहे. 

.... तर होईल "धक्काबुक्की'ची पुनरावृत्ती 
प्रस्तावावर मतदानाची मागणी केली असता कायद्यानुसार त्याची अंमलबजावणी न करता नगरसेवकांचा अधिकार डावलून सत्ताधाऱ्यांच्या निर्णयाला कल दिल्याने संतप्त विरोधकांनी नगरसचिवांना17 एप्रिलच्या सभेत धक्काबुक्की केली होती. त्यांच्याकडुन बिनबुडाचे उत्तरे मिळू लागली तर भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीतीही श्री. खरादी यांनी व्यक्त केली. 

आम्ही दिलेला प्रस्ताव फेटाळला जाणार याची शंभर टक्के खात्री आहे. पण सभागृहाचे कामकाज प्रथेनुसार चालते कायद्यानुसार नाही याबाबत एकाही अभ्यासू नगरसेवकाला खंत वाटत नाही हे दुर्देव आहे. "एमआयएम' भारताचे कायदे पाळत नाही असा आक्षेप घेतला जातो. सोलापूर महापालिकेत कायद्याची खिल्ली उडवली जात असताना "देशभक्त' पक्षांचे नगरसेवक मूग गिळून गप्प बसतात, त्याचे काय? 
- रियाज खरादी, नगरसेवक, एमआयएम 

Web Title: Solapur Municipal Corporation MIM corporater demand