बार कौन्सिल सदस्य होण्यासाठी नव्या, जुन्यांमध्ये चुरस 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

सोलापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष असलेले ऍड. लक्ष्मण मारडकर हे पहिल्यांदाच निवडणूक लढवीत आहेत. वकिलांच्या प्रश्‍नांवर सकारात्मक मार्ग काढण्यासाठी ते मतांची मागणी करत आहेत. ज्येष्ठ मंडळी रिंगणात असतानाही ऍड. असीम बांगी हे आपले नशीब आजमावीत आहेत. तसेच बार्शीचे ऍड. विकास जाधव हेही उमेदवार आहेत. 

सोलापूर : राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या निवडणुकीच्या प्रचाराने चांगलाच जोर धरला आहे. उमेदवार राज्यातील वकिलांच्या भेटीवर असून 28 मार्च रोजी महाराष्ट्र आणि गोव्यातील जिल्हा आणि तालुका न्यायालय आवारात मतदान होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातून ऍड. मिलिंद थोबडे, ऍड. लक्ष्मण मारडकर, ऍड. असीम बांगी, ऍड. विकास जाधव हे चार उमेदवार आहेत. 

तब्बल आठ वर्षांच्या कालावधीनंतर लागलेल्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातून साडेतीन हजारांहून अधिक वकील मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत. जिल्ह्यातून चार वकील निवडणूक रिंगणात असून मतांसाठी जिल्हा आणि तालुक्‍यांना भेटी चालू आहेत. ऍड. मिलिंद थोबडे हे महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे विद्यमान सदस्य आहेत. ते दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ऍड. थोबडे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

सोलापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष असलेले ऍड. लक्ष्मण मारडकर हे पहिल्यांदाच निवडणूक लढवीत आहेत. वकिलांच्या प्रश्‍नांवर सकारात्मक मार्ग काढण्यासाठी ते मतांची मागणी करत आहेत. ज्येष्ठ मंडळी रिंगणात असतानाही ऍड. असीम बांगी हे आपले नशीब आजमावीत आहेत. तसेच बार्शीचे ऍड. विकास जाधव हेही उमेदवार आहेत. 

बार कौन्सिल निवडणुकीचा प्रचार उत्साहात सुरू आहे. राज्यभरातून सकारात्मक प्रतिसाद आहे. आजवर केलेल्या कामांमुळे पुन्हा निश्‍चितच संधी मिळेल. 
- ऍड. मिलिंद थोबडे, उमेदवार 

या निवडणुकीत 19 उमेदवार विद्यमान सदस्य आहेत. प्रचाराच्या निमित्ताने अनेक जिल्ह्यांमध्ये वकिलांच्या भेटी घेतल्या. नवोदितांना संधी मिळावी अशी वकिलांची इच्छा आहे. 
- ऍड. लक्ष्मण मारडकर, उमेदवार 

वकिलांवर हल्ले वाढले आहेत. वकिलांच्या प्रश्‍नांकडे कोणाचेही लक्ष नाही. मूलभूत सुविधांचाही अभाव आहे. त्यामुळे परिवर्तन होण्याची शक्‍यता आहे. जुन्या लोकांना वकील मंडळी कंटाळली आहेत. 
- ऍड. विकास जाधव, उमेदवार

Web Title: Solapur news Bar Council election