'सोलापूर नव्हे ....जांबमुनी महाराज किंवा सुफीसंत शहाजहूर' 

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सोलापुरात उमटले. होळकर यांचे नाव मिळाल्याने धनगर समाजाने दिवाळी साजरी केली, त्याच्या दुसऱ्याच दिवशी लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या शिवा संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या नावाने शिमगा केला. सोमवारी सोलापूर बंदचे आवाहनही केले

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद चिघळला असताना आता प्रत्यक्षात सोलापूरचे नामांतर करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सभेत दाखल झाला आहे. कॉंग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांनी हा प्रस्ताव दिला आहे. 

सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सोलापुरात उमटले. होळकर यांचे नाव मिळाल्याने धनगर समाजाने दिवाळी साजरी केली, त्याच्या दुसऱ्याच दिवशी लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या शिवा संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या नावाने शिमगा केला. सोमवारी सोलापूर बंदचे आवाहनही केले. या दोन्ही घटनांच्या पार्श्‍वभूमीवर सोलापुरात "नामांतर' चळवळीने जोर धरला आणि थेट सोलपूरचेच नाव बदलण्याची मागणी सोलापूरकरांनी निवडून दिलेल्या विश्‍वस्तांनी केली आहे. 

सोलापुरात मोची आणि मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात राहतात. त्यामुळे सोलापूरचे नामकरण मोची समाजाचे कुलगुरू "जांबमुनी महाराज' किंवा सोलापूरचे "सुफीसंत शाहजहूर' असे करावे असा प्रस्ताव महापालिकेच्या सभेत दाखल झाला आहे. एमआयएमचे रियाज खरादी आणि कॉंग्रेसच्या वैष्णवी करगुळे यांनी हा प्रस्ताव दिला आहे. महापालिकेतील बेकायदेशीर कामकाज आणि नागरिकांच्या समस्यांबाबत इतक्‍या गांभीर्याने न घेणाऱ्या नगरसेवकांनी "नामांतरा'ची दखल मात्र फारच मनावर घेतल्याचे दिसून येत आहे. 

सभागृहात "अत्रे' दिसतील का? 
"बेळ' हा शब्द कन्नड भाषेत आहेत. त्यामुळे बेळगाव कर्नाटकातच राहिले पाहिजे असा हट्ट कर्नाटक धार्जिण्यांनी घेतला होता. त्यावेळी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी "लंडन' नावातही मराठी शब्द आहे म्हणून लंडन महाराष्ट्रात आणायचे का? असे सडेतोड उत्तर दिले होते. सोलापूरच्या नामांतराच्या प्रस्तावावर अशा प्रकारे सडेतोड उत्तर देणारा एखादे अत्रे महापालिकेच्या सभागृहात दिसतील का हे सभेच्या दिवशीच स्पष्ट होईल

Web Title: solapur news: city politics