मंगळवेढा: स्वखर्चातून बंधाऱ्याची दुरुस्ती

हुकूम मलाणी
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

प्रशासनाने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले या भागातील शेतकरी व ग्रामस्थांनी केलेल्या मागणीवरुन यासाठी शासकीय निधीची वाट न पाहता स्व-खर्चातून हे काम करुन दिले. - सचिन जाधव कार्यकारी संचालक जकाराया शुगर वटवटे

मंगळवेढा : तालुक्याच्या पूर्व भागातील भीमा नदीवर असलेल्या सिध्दापूर ते वडापूर या दोन गावांना जोडणाऱ्या बंधाराचा भराव पावसाने वाहून गेला. संबधित खात्याने दखल न घेतल्याने जकाराया शुगर्स लि. या साखर कारखान्याने स्वखर्चातून दुरुस्ती करुन दिली. यामुळे या बंधाऱ्यावरुन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

या बंधाऱ्यावरुन सिध्दापूर, वडापूर, मिरी, येणकी, तांडोर या गावातील लोकांची ये-जा सतत असते. जादा क्षमतेच्या वाळू वाहतुकीनेही या बंधाऱ्यालगत दुरावस्था केली. दोन महिन्यांपूर्वी पुणे जिल्हयातील दमदार पावसाच्या हजेरीमुळे उजनी धरण भरल्याने जादा झालेले पाणी भिमा नदीत सोडले. भिमा व निरेच्या पुरामुळे बंधाय्राच्या दोन्ही बाजूकडील भराव वाहून गेल्यामुळे मोठया प्रमाणात पाणी वाहून गेले. या गावाचा वाहतुकीचा संपर्कही तुटला. भविष्यात ऊस शेतीला पाण्याची कमतरता भासणार असल्याने सिध्दापूर येथील ग्रामस्थ व जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे यांनी याबाबत भिमा पाटबंधारे विभागाच्या अधिकाय्रांला याबाबत निवेदनही दिले होते. पण पाणीपट्टीची वसुली असमाधानकारक असल्याचे कारणावरुन या विभागाने बंधाऱ्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी जकाराच्या शुगर्स लि. या खासगी कारखान्याने पुढाकार घेत पाच लाख खर्च करुन या बंधाय्राची दुरुस्ती करुन घेतली. यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली.

सिध्दापूर ग्रामस्थांच्या वतीने कार्यकारी संचालक सचिन जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दयानंद सोनगे, संतोष सोनगे, रफिक पटेल, हरीभाऊ घुले, दगडू पुजारी, शिवगोंडा पाटील, सुभाष पाटील, ओग्याप्पा मलकारी, महादेव सिंदखेड, बसवराज पुजारी, मल्लू बिराजदार, महादेव नाटीकर, अमोल गुंड, शकील पटेल,गफूर शेख, रमेश भजनावळे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रशासनाने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले या भागातील शेतकरी व ग्रामस्थांनी केलेल्या मागणीवरुन यासाठी शासकीय निधीची वाट न पाहता स्व-खर्चातून हे काम करुन दिले. - सचिन जाधव कार्यकारी संचालक जकाराया शुगर वटवटे

संबधित खात्याकडे दुरस्तीबाबत निवेदन देवूनही त्यांनी लक्ष न दिल्यामुळे आम्ही जकाराया कारखान्याकडे दुरस्तीसाठी सहकार्य मागीतले असता त्यांनी सहकार्य केले.
- संतोष सोनगे सिध्दापूर

Web Title: Solapur news dam work on bhima river