पंढरपूरच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका: डॉ. अतुल भोसले

अभय जोशी
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

भाविकांना रांगेत तिष्ठत उभे रहावे लागू नये यासाठी टोकन पध्दतीची कार्यवाही करण्याचा निर्णय डॉ.भोसले यांच्या पुढाकारातून झाला आहे. त्याचा फायदा बाजारपेठेतील उलाढाल वाढीसाठी होणार आहे. मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंधासह सेवा शर्ती व नियम लागू व्हावेत यासाठी श्री.भोसले यांनी पाठपुरावा केला होता. धर्मादाय आयुक्तांनी नुकतीच त्यास मंजूरी दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

पंढरपूर : श्री विठूरायाची नगरी स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी निधी खर्चाला मान्यता, भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे यासाठी टोकन पध्दतीचा निर्णय आणि सर्वसामान्य रुग्णांवर उत्तम उपचार व्हावेत यासाठी उपजिल्हा रुग्णालय चालवण्याची तयारी श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांनी दर्शवली आहे. केवळ मंदिरा पुुरते सीमीत न रहाता पंढरपूर शहरातील अन्य कामांसाठी डॉ.भोसले यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांच्या प्रयत्नांना पालिका आणि सर्व संबंधितांकडून सहकार्य मिळाल्यास अनेक चांगली कामे होतील असा विश्‍वास नागरिकांमधून व्यक्त होऊ लागला आहे. 

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नगरपालिकेलाच सुविधा पुरवाव्या लागतात. दरवर्षी एक कोटीहून अधिक भाविक येथे येतात. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नापैकी बहुतांष निधी भाविकांना सुविधा देण्यावरच खर्च होतो. हे लक्षात घेऊन 
श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीने त्यांच्या उत्पनापैकी पन्नास टक्के रक्कम पालिकेला द्यावी अशी मागणी पालिकेकडून केली जात आहे. आण्णासाहेब डांगे हे मंदिर समितीचे अध्यक्ष असताना कायद्यानुसार अशी रक्कम उचलून देता येणार नाही परंतु शहराच्या स्वच्छतेच्या कामात सहकार्य करु असे आश्‍वासन श्री.डांगे यांनी दिले होते. परंतु प्रत्यक्षात समितीने काहीही केले नव्हते. 

या पार्श्‍वभूमीवर समितीचे नूतन अध्यक्ष डॉ.भोसले यांनी पदभार स्विकारल्या पासून केवळ मंदिरा पुरता विचार न करता संपूर्ण पंढरपूरच्या विकासाचा विचार सुरु केला आहे. पंढरपूर हे देशातील पहिल्या क्रमांकाचे देवस्थान व्हावे, सीएसआर मधून पंढरपूरच्या विकासासाठी निधी मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. 

काल (ता.8) डॉ.भोसले यांनी मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट व उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. त्यानंतर हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मंदिर समितीकडून निधी खर्च करण्याचा निर्णय समितीने घेतला. लवकरच त्यासाठी निविदा मागवल्या जाणार आहेत. येथील उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग (आयसीयू ) बंद आहे. तज्ञ डॉक्‍टरांसह पस्तीसहून अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे मोठा सेटअप असून देखील तिथे आवश्‍यक त्या शस्त्रक्रिया होत नाहीत. हे लक्षात घेऊन हे रुग्णालय समितीच्या माध्यमातून चालवण्याची तयारी मंदिर समितीने केली आहे. त्यासाठी शासनाला प्रस्ताव देण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मंजूरी मिळाली तर उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून तज्ञ डॉक्‍टरांची सेवा रुग्णांना उपलब्ध होणार आहे. 

संतपीठ उभारणी साठी पर्यटन विकास महामंडळाची जागा मिळवण्याचे प्रयत्न डॉ.भोसले यांनी सुरु केले आहेत. त्यासाठी त्यांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या सोबत बैठक घेतली. लवकरच त्या संदर्भातील कार्यवाही करुन येत्या आषाढी पूर्वी संतपीठाचे काम सुरु व्हावे यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. 

भाविकांना रांगेत तिष्ठत उभे रहावे लागू नये यासाठी टोकन पध्दतीची कार्यवाही करण्याचा निर्णय डॉ.भोसले यांच्या पुढाकारातून झाला आहे. त्याचा फायदा बाजारपेठेतील उलाढाल वाढीसाठी होणार आहे. मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंधासह सेवा शर्ती व नियम लागू व्हावेत यासाठी श्री.भोसले यांनी पाठपुरावा केला होता. धर्मादाय आयुक्तांनी नुकतीच त्यास मंजूरी दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

एकंदरीतच डॉ.भोसले यांनी पदभार स्विकारल्या पासून ज्या पध्दतीची सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्याचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. डॉ.भोसले यांच्या प्रयत्नाला "मेरे अंगने मे तुम्हारा क्‍या काम है" या भूमिकेतून न पहाता आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील प्रामाणिकपणे मदत केली तर मंदिर समिती आणि पालिकेच्या सहकार्यातून अनेक चांगली कामे होतील अशी अपेक्षा आहे.

Web Title: Solapur news development in Pandharpur