कालवा, वितरिका, बोगद्याच्या स्वच्छतेमुळे जलवितरणात वाढ 

अभय दिवाणजी
गुरुवार, 17 मे 2018

सोलापूर - उजनी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावरील मोहोळ व कारंबा शाखा असे दोन शाखा कालवे, त्यावरील दोन वितरिका तसेच दोन बोगदे अन्‌ सहा डिपकटची स्वच्छता व डागडुजी केल्याने मोहोळ, दक्षिण, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना उन्हाळी आवर्तनावेळी जवळपास शंभर ते दीडशे क्‍युसेक पाणी जादा मिळाले. स्वच्छता व डागडुजीचे हे काम तब्बल 20 वर्षानंतर झाले आहे. शासकीय कामाचा हा सामाजिक बांधिलकीचा "सोलापूर पॅटर्न' राज्यभर गेला तर शासनाची प्रतिमा निश्‍चितच उजळून निघेल. 

सोलापूर - उजनी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावरील मोहोळ व कारंबा शाखा असे दोन शाखा कालवे, त्यावरील दोन वितरिका तसेच दोन बोगदे अन्‌ सहा डिपकटची स्वच्छता व डागडुजी केल्याने मोहोळ, दक्षिण, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना उन्हाळी आवर्तनावेळी जवळपास शंभर ते दीडशे क्‍युसेक पाणी जादा मिळाले. स्वच्छता व डागडुजीचे हे काम तब्बल 20 वर्षानंतर झाले आहे. शासकीय कामाचा हा सामाजिक बांधिलकीचा "सोलापूर पॅटर्न' राज्यभर गेला तर शासनाची प्रतिमा निश्‍चितच उजळून निघेल. 

गाळ, गवत, झाडी, झुडपे आणि पडझड यातून मोहोळ तालुक्‍यातील कालव्यावरील डिपकट, बोगदे व वितरिकांचा शोध घ्यावा अशी स्थिती होती. आर्थिक स्थिती डबघाईस आलेल्या पाटबंधारे विभागाकडून ठेकेदारी पद्धतीने निधी उपलब्धतेतून कामे होणे अडचणीचे झाले असते. त्यावर मात करताना खात्याकडील यांत्रिकी संघटनेकडे असलेल्या यंत्रणेचा उपयोग करत मोहोळचे उपविभागीय अधिकारी पी. एस. कांबळे यांनी 22 मीटर खोल असलेल्या सौंदणे कट कालव्याचे काम पूर्ण केले. त्यानंतर 17 मीटर खोल अर्जुनसोंड बोगदा, डिपकट, हिरज बोगदा, 18 मीटर खोलीचा डिपकट, लांबोटी वितरिका बोगदा, डिपकट, शिवाजीनगर बाळे डिपकट, सोलापूर-बार्शी रस्त्यावरील (बाळेजवळील) डिपकट, लांबोटी वितरिका, मोहोळ वितरिका क्र. 2 या ठिकाणची स्वच्छता मोहीम पूर्ण केली. अक्कलकोट, दक्षिण, उत्तर सोलापूर, मोहोळ या तालुक्‍यांसाठी महत्त्वाचा असलेल्या सौंदणे कटमार्गे एक हजार 50 क्‍युसेक पाणी सिंचनासाठी सोडणे संकल्पीत आहे. परंतु या ठिकाणी काही भाग वारंवार ढासळत असल्याने मोठी पडझड झाली होती. त्यामुळे पाण्याची वहन क्षमता कमी झाली होती. अशीच स्थिती अन्य ठिकाणीही होती. खात्याकडून या दुरुस्ती कामाची निविदा काढली जाते. परंतु शासनाच्या बदललेल्या धोरणामुळे निधीच्या उपलब्धतेतून पूर्ण करण्यास दोन-चार वर्षे गेली असती. ही बाब समजून यांत्रिकी संघटनेची मदत घेत हे काम अवघ्या दोन महिन्यात पूर्ण केले. यामुळे या भागात पाण्याच्या वहन क्षमतेत वाढ झाली. यामुळे आवर्तन कालावधी कमी झाला. त्यातून पाणी बचत अन्‌ लाभधारकांना उच्चदाबाने अत्यंत कमी कालावधीत पाणी देणे सोयीचे झाले आहे. याचा दृष्य परिणाम उन्हाळी हंगामातील आवर्तनावेळी दिसून आला. या कामासाठी अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले, कार्यकारी अभियंता नारायण जोशी यांनी मार्गदर्शन केले. 

उपलब्ध यंत्रणेचे सहकार्य घेऊन कालवा स्वच्छता मोहिमेचे सोलापुरात केलेले काम खूपच आदर्शवत आहे. यंत्रसामुग्रीचा कौशल्याने वापर करुन उजनीच्या पाण्याच्या बचतीतून उत्तम नियोजन केल्याचे हे उदाहरण आहे. हा आदर्श अन्य सहकाऱ्यांनी घेऊन शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ द्यावा. 
- सी. ए. बिराजदार,  सचिव, जलसंपदा विभाग 

उजनी डाव्या कालव्याचा टेलएंड असलेल्या चार तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पाणी देणे कसोटीचे काम होते. रोटेशन लांबत होते. कारंबा फाट्यामार्गे हिप्परगा तलावात पाणी आणण्याचा प्रयत्न आहे. यंत्रणेचा वापर करून स्वच्छता व डागडुजीमुळे लाभधारकांना पाणी देणे सोयीचे झाले. 
- शिवाजी चौगुले, अधीक्षक अभियंता 

सामाजिक बांधिलकी म्हणून खात्याकडील उपलब्ध यंत्रणेचा कौशल्याने वापर करून सहकार्यांच्या मदतीतून केलेल्या कामामुळे समाधान मिळाले. यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन उपयोगी पडले. कमी खर्चात अन्‌ गुणवत्तेच्या कसोटीवर हे काम उत्तम झाले आहे. 
- पी. एस. कांबळे,  उपविभागीय अधिकारी 

Web Title: solapur news due to cleanliness of canal tunnel hydroelectricity increases