'महावितरण'कडून शेतकऱ्यांना वसुलीचा शॉक! 

संतोष सिरसट
बुधवार, 7 जून 2017

खरिपाच्या पेरणीसाठी बी-बियाणे विकत घेण्यासाठी शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करू लागला आहे. त्यातच महावितरणने वसुलीची मोहीम तीव्र केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे

सोलापूर - राज्यातील शेतकऱ्यांकडे असलेले वीज बिल पूर्णपणे माफ करावे, शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी द्यावी, या मागण्यांसाठी राज्यभर शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. अशातच महावितरणने थकबाकीदार शेतकऱ्यांकडून वसुली सुरू केली आहे. वसुलीची मोहीम तीव्र करण्याच्या सूचना त्यांनी स्थानिक कार्यालयांना देऊन शेतकऱ्यांना वसुलीचा शॉकच दिला आहे. 

खरीप तोंडावर आला आहे. मागील दोन दिवसापासून चांगला पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची पेरण्या करण्यासाठीची लगबग सुरू झाली आहे. खरिपाच्या पेरणीसाठी बी-बियाणे विकत घेण्यासाठी शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करू लागला आहे. त्यातच महावितरणने वसुलीची मोहीम तीव्र केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. 

ज्यांच्याकडे थकबाकी आहे त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. बारामती परिमंडलाने त्यात पुढाकार घेतला आहे. बारामती परिमंडलातील पाच लाख 78 हजार 972 कृषिपंपधारकांकडे (शेतकऱ्यांकडे) वीजबिलांची दोन हजार 824 कोटी 61 लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसुलीसाठी महावितरणने प्रयत्न सुरू केले आहेत. शेतकऱ्यांकडे असलेली ही थकबाकी वसुलीसाठी सक्ती न करता त्यांना विनंती करण्यात येणार असल्याचेही महावितरणने म्हटले आहे. वसुलीची सक्ती असो किंवा विनंती त्याबाबत आताच बोलणे योग्य होते का? राज्यभर सध्या शेतकरी संपाचे लोण पसरले आहे. दररोज वेगवेगळ्या घटना घडत आहेत. अशातच महावितरणने केलेली ही विनंती कितपत योग्य आहे? असाही प्रश्‍न विचारला जात आहे. थकबाकी भरा, अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा देऊन महावितरणने या आंदोलनात तेल ओतण्याचे काम केल्याचे बोलले जात आहे. 

तर फौजदारी कारवाईही 
तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल, तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याच्या सूचनाही महावितणने आपल्या स्थानिक कार्यालयांना दिल्या आहेत. 

Web Title: Solapur News: Electricity bill farmer strike